पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक सराईत गुन्हेगार महिला रेल्वे अपघातात थोडक्यात बचावली. पोलीस अधिकाऱ्याने वेळीच या महिलेला रुळावरून बाजूला केल्यामुळे तिच्यावरील जीवघेणा प्रसंग टळला. हा सर्व थरार रेल्वे फलाटावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
रिटा सिंह (३८) असे गुन्हेगार महिलेचे नाव आहे. रिटा ही सराईत गुन्हेगार संतोष कुमार सिंह उर्फ बबलू ठाकूर याची पत्नी आहे. या दोघांवर खंडणी, जबरी चोरी यासारखे अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात आहे. दादर रेल्वे पोलिसांनी खंडणी आणि जबरी चोरीच्या गुन्हयात संतोष कुमार सिंह याला अटक केली होती.
हे ही वाचा:
जयंतराव…क्या हुआ तेरा वादा?
दहावी मूल्यांकन पद्धतीबाबत शाळा, पालक संभ्रमातच
उल्हासनगरात स्लॅब कोसळून सात जणांचा मृत्यू
फेसबुक, गूगल नरमले, ट्विटरचा माज कायम
शुक्रवारी रिटा हिला नेरुळ येथून अटक करून पोलीस ठाण्यात आणले जात असताना तिने महिला पोलिसांच्या हाताला झटका देऊन रुळावर उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वेळी समोरून येणारी ट्रेन बघून ती घाबरली आणि रुळावर पडली, दरम्यान दादर पोलीस ठाण्याचे सपोनि.अर्जुन घनवट यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करताच रुळावर उडी घेऊन महिला गुन्हेगार रिटा चे प्राण वाचवले. या सर्व थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस अधिकारी घनवट यांच्या धाडसाचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
अखेर दादर रेल्वे पोलिसांनी रिटाला ताब्यात घेऊन तिला अटक केली आहे. रिटा हिच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असून दोघे पती पत्नी पोलीस पकडण्यासाठी गेल्यावर तेथून पळून जात होते. पतीला अटक केल्यानंतर रिटा ही रायगड येथे पळून गेली होती. पोलीस मागावर असल्याचे कळताच तीने रायगड येथून नेरुळ या ठिकाणी आली. मात्र पोलिसांनी सतत तिचा पाठलाग करून तिला अखेरीस नेरुळ येथून अटक केली आहे.