त्या दोघींनी बिहारमधून मुंबईत येण्याचा निर्णय घेतला तोही चोरीसाठी. त्यासाठी त्या थेट विमानाने मुंबईत दाखल झाल्या पण…
बिहारमधून चोरीसाठी मुंबईत येणाऱ्या दोन महिलांना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. बिहारच्या पटना येथून मुंबईत येऊन या महिला वेगवेगळ्या भागातील बाजारपेठेत किंवा मॉलमध्ये चोरी करत असत. या दोघी विमानाने मुंबईला येऊन थ्री स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य करत आणि चार ते पाच दिवसात लाखांचा ऐवज घेऊन पुन्हा बिहारमध्ये जात असल्याचे तपासातून समोर आले आहे. दीपांजली बबलू तिवारी आणि सौम्या राजकुमार मिश्रा अशी अटक झालेल्या महिलांची नावे आहेत.
या दोन्हीही महिला बिहारच्या असून त्यांचे पती काहीच काम करत नसल्यामुळे त्यांनी चोऱ्या करण्यास सुरुवात केली. ४ ऑगस्ट रोजी दुपारी त्या मुंबई विमानतळावर उतरल्या आणि तिथून थेट त्या वांद्रे येथील एल्को मार्केटमध्ये गेल्या. तिथून त्यांनी एका महिलेची पर्स चोरी केली. दुसऱ्या दिवशीही याच मार्केटमधून दुसऱ्या महिलेची पर्स पळवली.
हे ही वाचा:
नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा मार्ग ठरला
मुंबई महापालिकेत बदल्या, बढत्यांमध्ये घोटाळा?
ट्विटर इंडिया प्रमुखांची उचलबांगडी
कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?
दोन्ही महिलांनी तक्रार केल्यावर सलग एकाच ठिकाणी गुन्हा घडल्याने पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी मार्केटमधील सीसीटीव्हीचे चित्रण पहिले असता या दोन महिला चोरी करताना दिसून आल्या. चित्रणाच्या मदतीने त्यांचे रेखाचित्र बनवले. सलग चोरी करत असल्याने त्या पुन्हा एल्को मार्केटमध्ये येतील असा अंदाज बांधत पोलिसांनी सापळा रचला. ७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी या दोघींना अटक केली आणि त्या राहत असलेल्या थ्री स्टार हॉटेलमधून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.
तीन ते चार लाखांचा चोरीचा ऐवज विमानातून नेल्यास पकडले जाण्याची शक्यता असल्याने दोघीही परतीच्या प्रवासासाठी बसचा पर्याय निवडत असत. ७ ऑगस्टला त्या बसने परतणार होत्या पण त्या पूर्वीच त्यांना अटक करण्यात आली. या दोघींच्या अटकेमुळे इतर अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.