महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकात्मक गाण्यामधून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने त्यांना ‘गद्दार’ असे संबोधले होते. यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना नेते आक्रमक झाले होते. कुणाल कामराविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आणि या प्रकरणी कुणाल कामराला अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करत ७ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते.
कुणाल कामराने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरविरोधात कुणाल कामराने शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ही एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. दरम्यान, कुणाल कामराने दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, ही कारवाई संविधानाच्या अनुच्छेद १९ (१) (अ) (भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार), १९ (१) (जी) (कोणताही व्यवसाय आणि व्यवसाय करण्याचा अधिकार) आणि २१ (जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार) अंतर्गत हमी दिलेल्या त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचं याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर आता २१ एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
टॅरिफ वॉरमुळे शेअर बाजार गडगडला; जगात काय परिस्थिती?
कोलकाता: रामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या हिंदू भाविकांवर हल्ला
काही जणांना विनाकारण छाती बडवण्याची सवय!
सूर्य तिलक पाहताच रामभक्त भावविभोर
यापूर्वी ५ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या तिसऱ्या समन्सलाही कुणाल हजर राहिला नाही. त्यामुळे त्याने आता न्यायालयाची दारे ठोठावली आहेत. कुणाल पोलिसांनी पाठवलेल्या पहिल्या दोन समन्सलाही गैरहजर राहिला होता. त्याने पोलिसांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचे जबाब नोंदवण्याची विनंती केली होती. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून, कुणाल कामरा याच्यावर २४ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना नेत्याने तक्रारीत आरोप केला आहे की, मुंबईतील खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हबिता स्टुडिओमध्ये शो दरम्यान, कामरा यांनी शिंदे यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी करून त्यांची बदनामी केली.