कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या महिन्यात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या धक्कादायक प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी कोलकाता पोलिसांवर आरोप केले आहेत.
या प्रकरणातील पीडित प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या कुटुंबीयांनी सांगितले की, कोलकाता पोलिसांनी डॉक्टराच्या मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना लाच देण्याचाही प्रयत्न करण्यात आला, असा दावा डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीय म्हणाले की, “पोलिसांनी सुरुवातीपासूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. आम्हाला मृतदेह पाहण्याची परवानगी नव्हती. मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी नेत असताना आम्हाला पोलीस ठाण्यामध्ये थांबावे लागले. जेव्हा मृतदेह आमच्या ताब्यात देण्यात आला तेव्हा एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आम्हाला पैशाची ऑफर दिली, जी आम्ही लगेच नाकारली,” असा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
न्यूटन, लेबनीझ यांच्यापेक्षा ‘माधव’ थोर होते!
‘IC 814’ चा दहशतवादी प्रवाशांना म्हणाला होता, ‘इस्लाम धर्म स्वीकारा!
पॅरालिम्पिकमध्ये २१ वे पदक; महाराष्ट्राचा सुपुत्र सचिन खिलारीला गोळा फेकमध्ये रौप्य
दुष्काळात उपासमारी टाळण्यासाठी वन्यप्राण्यांची कत्तल होणार !
कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घडलेल्या या प्रकरणाचा तपास सुरुवातीला कोलकाता पोलिसांनी केला होता. पण, नंतर कोलकाता उच्च न्यायालयाने तपास केंद्रीय एजन्सीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिल्यानंतर तो सीबीआयकडे सोपवण्यात आला. दरम्यान, कोलकाता आणि राज्याच्या इतर भागात निदर्शने सुरूच होती. बुधवारी रात्री ‘रिक्लेम द नाईट’ मोहिमेचा भाग म्हणून हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. आपल्या मुलीच्या न्यायासाठी लढणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे पालकही या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभेने मंगळवारी एकमताने बलात्कार विरोधी विधेयक मंजूर केले आहे.