पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यामध्ये ३१ वर्षीय डॉक्टरवर बलात्कार झाला होता. यावरून देशभरात संतापाची लाट उसळली असून याचे पडसाद विविध राज्यांमध्ये उमटत आहेत. यानंतर आता कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात येणार आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
आरजी कार मेडिकल कॉलेज आणि सरकारी रुग्णालयात पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा मृतदेह शुक्रवारी सापडला यामुळे मोठी खळबळ उडाली. प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तरुणीचे डोळे, तोंड आणि गुप्त भागातून रक्तस्त्राव होत होता, अशी माहिती आहे. शिवाय तिच्या पोटावर, डाव्या पायाला, मानेला, उजव्या हाताला, ओठांना जखमा होत्या. यानंतर देशभरात आंदोलन सुरू होते. दरम्यान, न्यायालयाने आंदोलनानंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तातडीने सीबीआयकडे सोपवण्यास सांगितले आहे. प्रशासन पीडितेच्या कुटुंबासोबत दिसत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंशी पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी साधणार संवाद !
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक १ हजार ९५० कामांना मंजुरी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या लोगोत शिवरायांची प्रतिमा !
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
सुनावणीदरम्यान, रुग्णालय प्रशासनाने हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले, त्यावर उच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली. रुग्णालय प्रशासनाच्या अनेक त्रुटी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. रुग्णालय प्रशासनानेच गुन्हा नोंदवायला हवा होता. याशिवाय पुराव्यांशी छेडछाड होणार नाही याची खात्री करण्यासाठी पीडितेच्या पालकांना स्वतंत्र संस्थेकडून तपास हवा आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.