नवी दिल्लीतील साक्षी हत्या प्रकरणात मोठे यश प्राप्त झाले आहे. साहिलने साक्षीवर ज्या चाकूने २१वेळा वार केले होते, तो चाकू अखेर पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी रिठाला येथून हा चाकू हस्तगत केला आहे. चाकूने वार केल्यानंतर साहिलने साक्षीची दगडाने ठेचून हत्या केली होती. हे भयंकर दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. पोलिसांनी साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंद शहरमधून अटक केली होती.
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी साक्षीच्या सुमारे १० मित्रमैत्रिणींचे जबाब घेतले आहेत. यामध्ये अजय उर्फ झबरू, नीतू आणि प्रवीण यांचा समावेश आहे. पोलिसांनी साहिलचा फोनही जप्त केला आहे. या व्यतिरिक्त सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या आठ जणांची ओळख पटवण्यात आली आहे. पोलिस त्यांच्या जबाबांचीही नोंद घेत आहेत. न्यायालयाने साहिलला गुरुवारी तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत साहिलने दिलेल्या माहितीनुसार, साक्षीची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. तसेच, साहिल बुलंदशहरला कोणत्या मार्गाने गेला, याचाही माग काढण्यात पोलिसांना यश आले आहे. हत्या केल्यानंतर साहिलने चाकू रिठालामधील झुडपांमध्ये टाकला होता, असा पोलिसांचा दावा आहे.
हे ही वाचा:
सायनमध्ये भरदिवसा हैदराबादच्या ज्वेलर्सचे अपहरण करून केली २ कोटींची लूट
मुख्यमंत्र्यांकडून किल्ल्यांच्या संवर्धनाला प्राधान्य, प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना
रायगडचा इतिहास सांगणाऱ्या गाईडना पाच लाखांचा विमा
शिवराज्याभिषेक सोहळ्याचा रायगड पुन्हा होणार साक्षी
साक्षी साहिलला त्याच्या मित्रांसमोर ओरडली होती, तसेच त्याच्यासोबत परत येण्यास तिने नकार दिला होता. त्यामुळे साहिल रागात होता. त्यामुळे दोघांमधील नाते बिघडले होते, असे साहिलने पोलिस चौकशीत सांगितले आहे. आतापर्यंत केल्या गेलेल्या चौकशीत, या गुन्ह्यात साहिलचा कोणीही मित्र सहभागी नव्हता. हत्येचा कट त्याने एकट्यानेच रचला होता, असे आढळून आले आहे.
साक्षीच्या शरीरावर ३४ जखमा
साक्षीच्या शरीरावर ३४ जखमा आढळून आल्या आहेत. साहिल शाहबाद डेरी परिसरात आपल्या कुटुंबासमवेत भाड्याच्या घरात राहात होता. त्याच्या कुटुंबात तीन बहिणी, आई आणि वडील आहेत. साहिल मॅकेनिक असून तो एसी आणि फ्रिज बनवतो. पोलिसांच्या चौकशीत असे आढळून आले आहे की, साक्षी आणि साहिल यांचे संबंध होते. मात्र दोघांच्या नात्यात काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला होता. याचे कारण होता प्रवीण हा मुलगा. साक्षीचे प्रवीणशीही नाते होते. मात्र साहिल पुन्हा साक्षीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. मात्र साक्षी त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा साहिल साक्षीला पुन्हा परतण्याचे आर्जव करत होता, तेव्हा साक्षी आणि तिचा मित्र झबरूने साहिलला धमकी दिली होती. त्यामुळे साक्षीसाठी झबरू साहिलला मारण्याआधीच साहिलने साक्षीची हत्या केली, असे पोलिसांच्या चौकशीत आढळले आहे.