रवी राणा आणि नवनीत राणा या दांपत्याला खार पोलिस स्टेशनला भेटून निघाले असताना भाजपाचे आक्रमक नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली आणि त्यात फुटलेली काच लागून त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली.
शनिवारी राणा दांपत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा निश्चय केलेला असताना त्यांना संध्याकाळी घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आणि खार पोलिस ठाण्यात नेऊन त्यांना अटक करण्यात आली. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जाण्याची घोषणा किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानुसार ते रात्री ही भेट सोमय्या यांनी घेतली त्यानंतर गाडीने जात असताना वांद्रे येथे त्यांच्या गाडीवर हा हल्ला झाला. गाडी जात असताना रस्त्याच्या एका बाजुला त्यांचा निषेध करण्यासाठी उभ्या असलेल्या शिवसैनिकांतून कुणीतरी दगड भिरकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. किरीट सोमय्या मागच्या सीटवर बसलेले होते. त्याचवेळी हा दगड काचेवर आदळल्याचे त्याच्या चित्रीकरणात दिसत आहे. त्या दगडामुळे काच फुटली आणि काचेच्या तुकड्यामुळे सोमय्या जखमी झाले.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर राणा दाम्पत्यांनी दाखल केली तक्रार
शिवसैनिक सोडून राणा दाम्पत्यालाच अटक
अफगाणिस्तानात मशिदीत झालेल्या स्फोटात ३० ठार
सोमय्या हे गेले अनेक महिने महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आघाडीवर आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर आरोप करत त्यांना अडचणीत आणले आहे. तेव्हापासून किरीट सोमय्या हे चर्चेत आहेत. मागे पुणे दौऱ्याला असतानाही त्यांच्यावर हल्ला झाला होता. तेव्हाही ते जखमी झाले होते.
शनिवारी राणा दांपत्याने सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा निर्धार व्यक्त केला होता. तेव्हापासून त्यांना घरातून बाहेर पडू नये म्हणून शिवसैनिकांनी त्यांच्या खार येथील घराला आणि मातोश्रीला वेढले होते. शेवटी राणा दांपत्याने माघार घेतली. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली. त्यांनाच भेटण्यासाठी सोमय्या खार पोलिस ठाण्याला गेले होते.