माजी सहकाऱ्यानेच केली इघे यांची हत्या

माजी सहकाऱ्यानेच केली इघे यांची हत्या

नाशिकमधील भाजपचे पदाधिकारी अमोल इघे (३७) यांच्या झालेल्या हत्येतील मारेकऱ्याचा शोध लागला आहे. सातपूरच्या कार्बन नाका परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागला आहे. नाशिकमधील गजबजलेल्या एमआयडीसी परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अध्यक्ष अमोल इघे यांची त्यांच्या माजी सहकाऱ्याने हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हल्लेखोर विनोद बर्वे याला राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित कामगार संघटना, औद्योगिक युनिट स्थापन करायची होती. पण या ठिकाणी अमोल इघे यांची भाजप समर्थित युनियन होती. बर्वे हे भाजप समर्थित युनियनचा भाग होते, ज्याचे व्यवस्थापन इघे करत होते. या प्रकरणातून इघे यांची हत्या झाली, असे पोलीस आयुक्त विजय खरात यांनी सांगितले. बर्वे हे ठाण्यातील रहिवासी होते. दुपारी ३.३० च्या सुमारास मुंबई च्या दिशेने पळ काढत असताना नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली. या हत्येनंतर नाशिक भाजप युनिटने तीन शहरांचे आमदार , महापौर आणि पक्षाच्या नगरसेवकांसह २०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नेत्यांसह सातपूर पोलीस ठाण्यासमोर तीन तासाहून अधिक काळ धरणे आंदोलन केले.

हे ही वाचा:

पोलीस आयुक्त नगराळेंची पत्नी पोटगीपासून वंचित

‘सरकारला नाईट लाईफएवढीच काळजी महिलांच्या सुरक्षेची का नाही?’

कोरोनाचा नवा व्हेरियन्ट ऑमिक्रॉनची चर्चा

जॅकलिनचा ‘तो’ रोमँटिक फोटो ठरणार का ED साठी पुरावा?

 

इघे हे सकाळी त्यांच्या कारमधून कामानिमित्त जात होते. त्याचवेळी बर्वे हे त्यांना भेटले.आणि बोलता बोलता अचानक इघे यांच्या मानेवर धारदार चाकूने वार केला. इघे यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना दीड इंच खोल जखम झाली होती, असे खरात म्हणाले.

गेल्या पाच दिवसांत शहरात तीन खून झाले आहेत, यात इघे यांचाही समावेश आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती या घटनांवरुन लक्षात येते, असे भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना पदावरून काढण्यासाठी भाजपने जिल्हा प्रशासनाला निवेदन केले आहे.

Exit mobile version