हवाई सुंदरी हत्येप्रकरणातील आरोपीने पोलिस कोठडीत घेतला गळफास

मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जे.जे रुग्णालय येथे पाठविण्यात आला

हवाई सुंदरी हत्येप्रकरणातील आरोपीने पोलिस कोठडीत घेतला गळफास

पवईतील २४ वर्षीय हवाई सुंदरीच्या हत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या ३५ वर्षीय विक्रम आरोवाल या आरोपीने अंधेरीच्या जनरल लॉकअप मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. विक्रम याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जे.जे रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.

 

याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास गुन्हे शाखा करीत आहे. विक्रम आरोवाल हा विवाहित होता व कुटुंबासह तुंगा व्हिलेज येथे राहण्यास होता. पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एन.जी.कॉम्प्लेक्स मध्ये साफसफाईचे काम करणारा विक्रम आरोवाल याने त्याच सोसायटीत राहणाऱ्या २४ वर्षीय रुपल ओग्रे या तरुणीची गळा चिरून हत्या केली होती.

 

हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेणाऱ्या रुपल हिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात त्याने ही हत्या केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी पवई पोलिसांनी विक्रम आरोवाल याला अटक केली होती. ८ सप्टेंबर पर्यंत विक्रमला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची रवानगी अंधेरी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या जनरल लॉकअप (सामान्य पोलीस कोठडी) मध्ये ठेवण्यात आले होते. गुरुवारी पहाटे त्याने पोलीस कोठडीतील स्वच्छता गृहात स्वतःच्या पॅन्टला गळफास लावून आत्महत्या केली.

हे ही वाचा:

शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ महाराष्ट्रात परतणार

आयआयटीचे संचालक म्हणतात मांसाहारामुळे हिमाचलमध्ये ढगफुटी

उदयनिधीनंतर डीएमकेच्या नेत्याने ओकली गरळ; सनातन धर्माची HIV बरोबर तुलना

१८ सप्टेंबरला काय होणार? धक्कातंत्राचा विरोधकांना धसका

हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला असून अंधेरी पोलिसांनी पवई पोलिसांना या घटनेची माहिती देऊन मृतदेह ताब्यात घेतला व तो शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. विक्रम आरोवाल याची गुरुवारी पोलिस कोठडी संपली होती व त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते अशी माहिती एका अधिकारी यांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

Exit mobile version