मीरा रोड येथून एका तेरा वर्षीय मुलाचे धुम्रपान करायला जाण्याच्या बहाण्याने अपहरण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी मुलाचा मृतदेह वाळीव येथील पुलाच्या परिसरात टाकला. यानंतर दोघांनी मुलाच्या आईला फोन करून ३५ लाख रुपयांची मागणी केली.
मयांक ठाकूर हा इयत्ता आठवीचा विद्यार्थी असून तो मुख्य आरोपी अफजल अन्सारी (२२) याच्या ओळखीचा होता. दोघे अनेकदा एकत्र धूम्रपान करत होते, अशी माहिती परिमंडळाचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. दुसरा आरोपी इमरान शेख (२४) हा अन्सारीचा मित्र आहे.
मयांकच्या काकांनी मयांकला या दोघांसोबत धूम्रपान करताना पकडले होते. त्यावेळी त्याच्या काकाने त्याच्या आईकडे त्यांची तक्रार केली होती. मयांकच्या आईने यावरून त्याला फटकारले होते. दुसऱ्या दिवशी हिना संध्याकाळी कामासाठी निघून गेल्या. आई कामाला गेल्यावर मयांक अन्सारी आणि शेखला धूम्रपान करण्यासाठी भेटला. तिघेजण बाइकवरून हायवेला पोहचले. दोघांच्या वागण्यावर मयांकला संशय आल्याने त्याने घरी सोडण्याची विनंती केली. मात्र अफजल आणि इमरान मयांकला निर्जनस्थळी घेऊन गेले आणि तिथे त्याची चाकूने भोसकून हत्या केली. मयांकचा मृतदेह तिथेच टाकून दोघांनी पळ काढला.
त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मयांक घरी न आल्याने त्याच्या मोठ्या भावाने ही घटना त्याच्या आईच्या कानावर घातली. यानंतर त्यांनी मयांकचा शोध सुरु केला शोध करून मयांक न सापडल्याने सोमवारी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याच दिवशी तिला मयांकच्या फोनवरून फोन आला. मयांकचं अपहरण करण्यात आलं असून त्याच्या सुटकेसाठी ३५ लाख रुपये द्या, अशी मागणी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं केली.
हे ही वाचा:
नमाजाला सुट्टी मिळते, तर बजरंगाच्या पूजेसाठी मंगळवारी सुट्टी द्या!
तालिबानच्या छळामुळे शीखांनी सोडले अफगाणिस्तान; दिल्लीत येणार
करवा चौथवरील टिप्पणी अपमानास्पद; रत्ना पाठक- शाह, पिंकविलाला नोटीस
विचार बदलला म्हणून काय ठार माराल? उदय सामंत यांचे प्रत्युत्तर
या फोनच्या आधारे पोलिसांनी मयांकचं सिम ट्रेस केलं. ते अन्सारीकडे होतं. अन्सारीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. अन्सारीनं शेखचा ठावठिकाणा सांगितला. त्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या. मयांकची आई शांती पार्कमध्ये फ्लॅट घेऊ शकते. याचा अर्थ तिच्याकडे खूप पैसा आहे, असा अन्सारीचा समज झाला. त्यामुळेच त्यानं मयांकच्या आईकडे ३५ लाखांची मागणी केली होती.