एका सात वर्षीय मुलाला मोमोजचे आमिष दाखवून त्याचे अपहरण करून त्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने त्याचा पूर्वाश्रमीचा व्यवसायातील भागीदार असलेल्या मित्राच्या सात वर्षांच्या मुलाचे धारावीतून अपहरण केले आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोबी नजीब शेख हा दुबईत काम करत असे. त्याचे या मुलाच्या वडिलांसोबत काही आर्थिक व्यवहारांवरून वाद होते. त्याने या मुलाला लोकल रेल्वेमध्ये नेऊन त्याची पट्ट्याने गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर त्याने मुलाला नालासोपारा स्थानकात सोडून दिले. हा मुलगा विरार स्थानकात सापडला आणि तो सध्या त्याच्या कुटुंबासोबत आहे.
मुलगा रात्रीपर्यंत घरी न आल्याने मुलाचे वडील नाकीब शेख यांनी अपहरणाची तक्रार दाखल केली होती. अशी माहिती धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू बिडकर यांनी दिली. पोलिसांनी परिसरात पाहणी केली, मात्र येथे कुठेच सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. परिसरातच चौकशी सुरू असताना याच परिसरातील एका मुलाने अपहरण झालेला मुलगा एका पुरुषासोबत गेल्याचे सांगत त्याचे वर्णन केले पोलिसांनी मुख्य रस्त्यावरील चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली आणि पोलिसांना त्यातील एका कॅमेऱ्यात एक मुलगा एका व्यक्तीसोबत जात असल्याचे दिसले.
हे ही वाचा:
भारतात पाचपैकी चार अवयवदात्या महिला!
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आठ संघ झाले पात्र
हैदराबाद येथील एका निवासी इमारतीला आग, ९ जणांचा मृत्यू!
उत्तराखंडमध्ये बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठा
त्या व्यक्तीचे छायाचित्र मुलाच्या वडिलांना दाखवले असता, त्यांनी त्याला ओळखले आणि ती व्यक्ती नजीब, त्याचा पूर्वाश्रमीचा भागीदार असल्याचे सांगितले. नजीब हा मुलाला घेऊन वांद्रे स्थानकाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी हा मुलगा विरार स्थानकात सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आमचे पथक तिथे पोहोचले आणि त्यांनी मुलाला ताब्यात घेतले. या मुलाला त्याच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. आरोपीला अपहरण झाल्याच्या २४ तासांच्या आत अटक करण्यात यश आल्याचे बिडकर यांनी सांगितले.
मुलाच्या वडिलांशी आरोपीचा काही आर्थिक कारणावरून वाद झाला होता. त्याने या मुलाला मोमोजचे आमिष दाखवले. या आमिषाला भुलून हा मुलगा या अनोळखी पुरुषासोबत गेला, असे आरोपीने पोलिस चौकशीत सांगितले आहे. आरोपीला १६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.