देशाला हादरवणाऱ्या छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे २२ जवान हुतात्मा झाले होते. सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील राकेश्वर सिंग या जवानाला नक्षलवाद्यांनी बंदी बनवलं होतं. मात्र या जवानाला सोडवण्यात आता सीआरपीएफला यश आलं आहे. सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील राकेश्वर सिंग या जवानाचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर केला होता. त्या फोटोमध्ये राकेश्वर सिंग हा एका झोपडीत बसलेला दिसत होता.
छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांनी स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचं सांगितल होतं. तसेच त्याची सुटका व्हावी यासाठी एक अट समोर ठेवली होती. या अटीनुसार जवानाने सुटकेनंतर सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावं, अशी भूमिका नक्षलवाद्यांनी घेतली होती.
दुसरीकडे जवान राकेश्वर सिंह यांच्या पत्नीने छत्तीसगड सरकारकडे आपल्या पतीची सुटका करण्याची विनंती केली होती. नक्षलवाद्यांची मागणी मान्य करा आणि पतीची सुटका करा, अशी भावना या जवानाच्या पत्नी मिनू मनहस यांनी व्यक्त केली होती.
हे ही वाचा:
हल्ल्याला पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर आता नक्षलवाद्यांनी या जवानांची सुटका केल्याची माहिती समोर येत आहे.