केरळमधील बॉम्बस्फोटमालिकेप्रकरणी सोमवारी डॉमिनिक मार्टिन याला अटक करण्यात आली. त्याने या स्फोटाला आपणच जबाबदार असल्याचे स्पष्ट केल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात आयोजित प्रार्थना सभांमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती. त्याची जबाबदारी डॉमिनिक मार्टिन याने स्वीकारली होती. त्यानंतर त्याला दहशतवादविरोधी कायदा आणि हत्येच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. प्रार्थना सभेत स्फोटके ठेवल्याचा दावा करत डॉमिनिकने थ्रिसूर जिल्ह्यात पोलिसांकडे शरणागती पत्करली होती.
शरणागती पत्करण्याआधी मार्टिन याने फेसबुकवर एक व्हिडीओ जाहीर करून येहोव्हा विटनेसेस या ख्रिश्चन पंथाच्या प्रार्थना सभेत स्फोट घडवून आणण्यामागचे कारण विशद केले होते. त्यात त्याने तो स्वतः काही वर्षांपूर्वी येहोव्हा विटनेसेस या अल्पसंख्याक समुदायाशी निगडीत होता. मात्र त्यांची शिकवण त्याला पटली नाही, असे यात नमूद केले आहे. तसेच, ‘मी या संपूर्ण स्फोटाची जबाबदारी स्वीकारतो. तेथे स्फोट घडवणारा मीच आहे,’ असे त्याने स्पष्ट केले.
‘सहा वर्षांपूर्वी मला कळून चुकले की, ही संघटना चुकीच्या मार्गावर आहे आणि तिची शिकवण ही देशविरोधी आहे. ही शिकवण बदला, असे मी त्यांना कितीतरी वेळा सांगितले. मात्र त्यांनी ते कधीच मान्य केले नाही,’ असे डॉमिनिक याने स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानने आता वर्ल्डकपविजेत्या श्रीलंकेलाही नमवले
ललित पाटील प्रकरणात ससूनमधील कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ‘वैभव’ ईडीच्या निशाण्यावर
केरळमधील बॉम्बस्फोटमालिकेचा २० सदस्य करणार तपास
केरळच्या कलामसेरी येथील प्रार्थना सभेत रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटमालिकेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी झाले आहेत. सुरुवातीला या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सहा गंभीर जखमींपैकी ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर, सोमवारी एका १२ वर्षीय मुलीने प्राण सोडला. ती या दुर्घटनेत ९५ टक्के भाजली होती.