दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सातत्याने धक्के बसत असून आता त्यांचे स्वीय सचिव म्हणजेच पीए यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. स्वीय सचिव बिभव कुमार यांच्यावर दक्षता विभागाने म्हणजेच व्हिजिलेंस डिपार्टमेंटने मोठी कारवाई करत त्यांना पदावरून हटवले आहे.
दक्षता विभागाने अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांची नियुक्ती योग्य मानली नाही. दक्षता विभागाचे विशेष सचिव वाय व्ही व्ही जे राजशेखर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, बिभव कुमारच्या नियुक्तीसाठी निर्धारित प्रक्रिया आणि नियमांचे प्रामाणिकपणे पालन केले गेले नाही. त्यामुळे अशी नियुक्ती बेकायदेशीर आणी अवैध आहे. दक्षता संचालनालयाने १० एप्रिलपासून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव बिभव कुमार यांची सेवा समाप्त केली आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी मद्य धोरण घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी केली होती.
दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. केजरीवाल यांना संबंधित प्रकरणात २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. याप्रकरणी मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
पतंजलीला फटकारत सर्वोच्च न्यायालयाने माफीनामा फेटाळला
इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या नेत्याचे तीन मुलगे ठार
शुभमन गिल, राशिद खान यांनी साकारला गुजरातचा विजय
२२ मार्च २०२१ रोजी मनीष सिसोदिया यांनी नवे मद्य धोरण जाहीर केले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये हे नवे मद्य धोरण लागू लागू करण्यात आले. नवीन दारू धोरण आल्यानंतर सरकार दारू व्यवसायातून बाहेर पडले आणि संपूर्ण दारूची दुकाने खाजगी हातात गेली होती. नवीन धोरण आणण्यामागे सरकारचा तर्क होता की त्यामुळे माफिया राजवट संपेल आणि सरकारचा महसूल वाढेल. मात्र, नवीन धोरण सुरुवातीपासूनच वादात राहिले. पुढे गोंधळ वाढल्यावर जुलै २०२२ मध्ये सरकारने नवे मद्य धोरण रद्द करून जुने धोरण पुन्हा लागू केले. नव्या दारू धोरण घोटाळा प्रकरणी सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अटकेत आहेत.