पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्याने काश्मीरच्या विद्यार्थ्यांना अटक

पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्याने काश्मीरच्या विद्यार्थ्यांना अटक

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा दारूण पराभव केल्यानंतर पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्याप्रकरणी जम्मू काश्मीरमधील गंदेरबालमधील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सात काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. दहशतवादी घटनांमध्ये लावल्या जाणाऱ्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

या विद्यापीठात शिकणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांनी या काश्मिरी विद्यार्थ्यांनी पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्याची तक्रार दाखल केली होती. भारताचा पराभव झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी विजयोत्सव साजरा केला होता. त्यांनी त्यासाठी फटाके वाजवले आणि आतषबाजीही केली. अन्य विद्यार्थ्यांनी हे करण्यापासून त्यांना रोखल्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण झाला. या संदर्भात पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तौकिर भट, मोहसिन फारूक वाणी, आसिफ गुलझार वार, उमेर नाझिर दार, सय्यद खालिद बुखारी, सलिम राशिद मिर आणि उबैद अहमद यांना अटक केली.

यूएपीए कायद्यांतर्गत जामीन मिळवण्यासाठी कठोर नियम आहेत. तसेच, या कायद्याखाली अट केलेल्या संशयितांना कनिष्ठ न्यायालयात दिलासा मिळणेही अवघड असते.

सर्व सात जण आता कोठडीत असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. यूएपीए कायद्याखाली दोषी ठरल्यास सात वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड आकारला जातो. एखाद्या सामाजिक गटाने किंवा समूहाने दुसऱ्या समाजाच्या विरुद्ध काही गुन्हा केल्यास त्याच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जातो. मात्र या विद्यार्थ्यांवर नेमक्या कोणत्या कारणांमुळे यूएपीए कायद्याखाली गुन्ह दाखल केला आहे, याबाबत अधिक सांगण्यास जम्मू आणि काश्मीरच्या वरिष्ठ पोलिसांनी नकार दिला.

हे ही वाचा:

अडकलेल्या ४१ श्रमिकांपर्यंत पोहचण्यासाठी मानवी पद्धतीने खोदकामाला सुरुवात

अवकाळी पावसामुळे वीज कोसळून २० जणांचा मृत्यू!

अवकाळी पावसाच्या हजेरीने मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली

उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या मदतीला कोल इंडिया

विश्वचषक सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा करून ‘पाकिस्तान चिरायू होवो’ अशा अर्थाच्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरच्या बाहेरील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली. हा तक्रारदार कृषी विद्यापीठातील प्राणीविज्ञान विभागाचा विद्यार्थी आहे. या विद्यापीठात बहुतेक विद्यार्थी जम्मू काश्मीरचे आहेत. अन्य राज्यांतील अत्यंत कमी विद्यार्थी येथे शिकतात. त्यातलाच हा एक विद्यार्थी आहे.

Exit mobile version