श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनाप्रमुख सुखदेवसिंह गोगामेदी यांच्या हत्येप्रकरणी रोहित राठोड (२४) आणि नितीन फौजी (२६) यांना चंडिगडमधील दारूच्या दुकानातून अटक करण्यात आली. हत्येतील एका आरोपीला हरयाणामधून अटक करण्यात आल्यानंतर शनिवारी रात्री या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. राजस्थान पोलिसांचे एसआयटी पथक आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली. या दोघांना पळून जाण्यात मदत करणाऱ्या उधम सिंग (२३)यालाही अटक करण्यात आली आहे.
सोशल मीडिया आणि मोबाइल फोनच्या वापरावरून त्यांचा माग काढण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विशेष आयुक्त रवींद्रसिंह यादव यांनी सांगितले. फौजी आणि राठोड याने गोळ्या झाडल्या होत्या. तर, उधम सिंह याने हिसारमधून गाडीची व्यवस्था केली होती आणि मनालीपर्यंत पळून जाण्यापर्यंत त्यांना मदत केली होती.फौजी आणि राठोड यांच्या सोशल नेटवर्किंग प्रोफाइलचा तपास करत असताना फौजी याने हिसारमधील त्याचा जुना मित्र उधम सिंह याच्याशी संपर्क केल्याचे आढळले.
हे ही वाचा:
साडेतीनशे कोटींचं घबाड सापडण्यापूर्वी काँग्रेस खासदार साहू काळ्या पैशाने होते व्यथित
महाराष्ट्रात ISIS विरोधात NIA ची कारवाई, साकीब नाचनला अटक
अमेरिकेत भारतवंशी जाणून घेणार राम मंदिराचा संघर्ष
पोलिस उधम सिंह याच्या घरी धडकले असताना त्याच्या कुटुंबीयांनी तो मित्रांसह गुरुवारी मनालीला गेल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हिमाचल प्रदेशच्या पोलिसांना कळवले. मात्र तोपर्यंत हे तिघे तिथून निघाले होते. त्यानंतर ते चंडिगडच्या दिशेने गेल्याचे कळताच पोलिसांनी चंदिगडमधील सेक्टर २२मधून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
करणी सेनाप्रमुखाच्या हत्येनंतर स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य मानणाऱ्या रोहित गोदरा याने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. गोदरा याने गोगामेदी यांची हत्या करण्यासाठी दोघा मारेकऱ्यांना सुपारी दिली होती, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. बिश्नोई गँगला जयपूर आणि परिसरात वर्चस्व निर्माण करण्यात गोगामेदीचा अडथळा होत होता, असे सांगितले जाते. तसेच, या दोन संशयितांचा गोगामेदी यांची हत्या करण्यामागे वैयक्तिक हेतूही होता, असे सांगितले जाते. या दोन मारेकऱ्यांना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी शनिवारी संध्याकाळी हरियाणातून अटक करण्यात आली.