जयपूरमध्ये मंगळवारी दिवसाढवळ्या अज्ञातांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या केली. गोगामेडी यांच्या जयपूर येथील घरात घुसुन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून गोगामेडी यांची हत्या केली.या गोळीबारात गोगामेडी यांचे गार्ड अजित सिंग देखील जखमी झाले.सध्या ते आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.गोळीबारात एका गुन्हेगाराचाही गोळी लागून मृत्यू झाला आहे.दरम्यान घटनेच्या काही तासानंतर कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा सदस्य रोहित गोदारा याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
रोहित गोदरा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. रोहितने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘सर्व भावांना राम राम, मी रोहित गोदारा कपूरसरी, गोल्डी ब्रार बंधू, आज सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो, आम्ही ही हत्या घडवून आणली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तो आमच्या शत्रूंना भेटून त्यांना सहकार्य करायचा,तो त्यांना पूर्णपणे बळकट करण्याचे काम करायचा.आता राहिला प्रश्न तो आमच्या दुश्मनांचा,त्यांनी आता त्यांच्या घराच्या दारात मृत्यूला तयार रहावे, लवकरच त्यांच्यासोबत भेट होईल, अशी पोस्ट रोहित गोदारा कपूरसरी याने फेसबुकवर पोस्ट केली.
हे ही वाचा:
खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडेच्या मृत्यूनंतर त्याचा साथीदार परमजीत सिंग उर्फ धाडीला अटक!
इंडी आघाडीची बैठक पुढे ढकलली, आता डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात भेट
उद्धव ठाकरे म्हणतात, लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या…
उद्धव ठाकरे आणखी किती रडारड करणार?
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी चार-पाच व्यक्तींनी श्यामनगर भागात गोगामेडी यांच्या घरात घुसून गोळीबार केला. गोगामेडी, त्यांचा एक रक्षक आणि अन्य एक व्यक्ती गोळ्या लागल्याने जखमी झाले. जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी गोगामेडी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची पुष्टी केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने जयपूरमध्ये नाकाबंदी लागू केली आहे.