कर्नाटकातील एका सीईटी परीक्षा केंद्रात दोन विद्यार्थ्यांना जानवे आणि हातातील पवित्र धागा काढण्यास भाग पाडल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. हे प्रकरण चांगलेच तापल्यानंतर आता या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. संबंधित परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवमोगा जिल्ह्यातील शरावतीनगरमध्ये आदिचुंचनगिरी शाळेत सीईटी परीक्षेदरम्यान ही घटना घडल्याची बाब समोर आली होती. कर्नाटक कॉमन एंट्रंन्स (सीईटी) देणाऱ्या विद्यार्थ्यांना अंगातील जाणवे आणि हातातील धागा काढण्यास सांगण्यात आले होते.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नटराज भागवत नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, बीएनएस, २०२३ च्या कलम ११५(२), २९९, ३५१(१) आणि ३५२, कलम ३(५) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना धार्मिक चिन्हे काढून टाकण्याचे निर्देश कोणत्या परिस्थितीत देण्यात आले याचा शोध घेण्यासाठी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. एमसी सुधाकर यांनी हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आणि बिदरमधील एका परीक्षा केंद्रातूनही अशा तक्रारी आल्याची पुष्टी केली. तथापि, त्यांनी स्पष्ट केले की राज्यातील इतर बहुतेक केंद्रांवर परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडली. “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही घटना केवळ शिवमोगामध्येच नाही तर बिदरमध्येही घडली. दोन केंद्रे वगळता इतर सर्वत्र प्रक्रिया सुरळीत पार पडली. कोणत्याही गॅझेटची तपासणी किंवा तपासणी करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना कधीही अशा वस्तू तपासण्याचे किंवा काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले नाहीत,” असे ते एएनआयशी बोलताना म्हणाले. आम्ही सर्व धर्मांचा, त्यांच्या श्रद्धेचा आणि त्यांच्या कृतींचा आदर करतो. संबंधितांवर कारवाई करणार आहोत, असे ते पुढे म्हणाले. कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) चे निरीक्षण करणाऱ्या कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने (केईए) अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
हे ही वाचा :
व्हेंटिलेटरवर असताना एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रुग्णालयातील तंत्रज्ञ अटकेत
दक्षिण आफ्रिकेतून लवकरच नव्या चित्त्यांचे होणार आगमन!
गुजरातमध्ये ‘इंडी’ आघाडीत फूट; काँग्रेस पोटनिवडणुका स्वबळावर लढणार!
बांगलादेशात हिंदू नेत्याचे अपहरण करून निर्घृण हत्या
प्रकरण काय?
सीईटी परीक्षेसाठी केंद्रावर आलेल्या तीन विद्यार्थ्यांना हातात धागा आणि जानवे घातल्याने बाहेरच थांबवण्यात आले होते. त्यातील दोन मुलांनी जानवे आणि हातातला धागा काढला, मात्र एक विद्यार्थ्याने जानवे काढण्यास नकार दिला. तेव्हा त्याला १५ मिनिटांपर्यंत बाहेरच थांबवण्यात आले. अखेर त्याच्या हातातील धागा काढला, मात्र जानवे ठेवूनच त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला. यावर मुलाच्या मामाने सांगितले की, भाच्याने जानवे काढले नाही म्हणून त्याला १५ मिनिटे बाहेर उभे करण्यात आले. नंतर हातातला पवित्र धागा काढून तो त्या सुरक्षा रक्षकाने डस्टबिनमध्ये टाकला आणि नंतर आत सोडले. या घटनेची माहिती मिळताच लोकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.