तीन वर्षांत जवळपास ९०० बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी एक डॉक्टर आणि त्याच्या लॅब तंत्रज्ञाला नुकतीच अटक केली. हे दोघे म्हैसूर येथील त्यांच्या रुग्णालयात केल्या जाणाऱ्या प्रत्येक गर्भपातासाठी ३० हजार रुपये आकारत असत, असा आरोप आहे.
डॉ. चंदन बल्लाल आणि त्यांचा लॅब तंत्रज्ञ निसार यांच्यावर बेकायदा गर्भपात केल्याचा आरोप आहे. त्या दोघांना गेल्याच आठवड्यात ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. याच महिन्यात रुग्णालयाचे व्यवस्थापक आणि रिसेप्शनिस्ट रिझमा खान यांना अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा:
ललित पाटील प्रकरणी ससूनच्या कर्मचाऱ्याला अटक
श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याण मार्गातून मानवतेची सेवा केली
वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगे पाटलांची माघार; शब्द मागे घेत असल्याची कबुली
बोगद्यात अडकलेल्या मजूरांच्या मानसिक आरोग्यावर स्वदेशी ‘रोबो’ लक्ष ठेवणार
पोलिसांनी गेल्याच महिन्यात गर्भलिंग चाचणी करून स्त्रीभ्रूणहत्या करणारे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. एका गर्भवती महिलेला गाडीतून गर्भपात करण्यासाठी नेले जात असताना पोलिसांनी म्हैसूरनजीक मंड्या येथून शिवलिंगे गौडा आणि नयन कुमार यांना अटक केली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर दोघांनीही मंड्या येथील एका गुळाच्या कारखान्याचा अल्ट्रासाऊंड स्कॅन सेंटर म्हणून वापर केला जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. कोणत्याही प्रकारची अधिकृत कागदपत्रे किंवा प्रशासकीय परवानगी नसताना हे सेंटर चालवले जात असल्याचे पोलिसांना आढळल्यानंतर त्यांनी हे मशिन जप्त केले.
‘प्राथमिक चौकशीअंती असे आढळून आले आहे की, गेल्या तीन वर्षांत आरोपी डॉक्टरने त्याच्या सहाय्यकांच्या मदतीने म्हैसूर रुग्णालयात सुमारे ९०० गर्भपात केले आणि त्यासाठी प्रत्येकी ३० हजार रुपये आकारले,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. या रॅकेटशी संबंधित पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.