दिल्लीत एका अल्पवयीन मुलाने तरुणाची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी वाढत्या अल्पवयीन मारेकऱ्यांची संख्या हा चिंतेचा विषय ठरला आहे.
दिल्लीतील वेलकम परिसरात मंगळवारी रात्री एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने १७ वर्षीय किशोरवयीन तरुणाची अमानुषपणे चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ गुरुवारी व्हायरल झाला. आरोपीने या तरुणावर ५०पेक्षा जास्त वार करून हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाशेजारी नाचही केला. जाफराबादला राहाणाऱ्या या किशोरवयीन तरुणाला आरोपी गल्लीतून खेचून नेत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्या तरुणाचा मृत्यू झाला असताना हा आरोपी गळ्यावर वारंवार वार करत असल्याचे दिसत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मार्च २०२०मध्ये भरत नावाच्या तरुणासोबत एका लुटीदरम्यान त्याची हत्या केली होती. त्यानंतर त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. तेथून तो गेल्या महिन्यातच बाहेर आला होता. दिल्ली शहरात दररोज १० अल्पवयीन आरोपी गुन्ह्यांप्रकरणी पकडले जात आहेत. या प्रकरणी दररोज सरासरी आठ गुन्हे दाखल होत आहेत.
हे ही वाचा:
जम्मू काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या!
ब्रिक्स सदस्यत्वासाठी पाकिस्तानचा अर्ज!
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध; चार सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!
मुख्याध्यापकावर १४२ विद्यार्थीनींनी केला लैंगिक छळाचा आरोप!
१९ शहरांपैकी दिल्लीत अल्पवयीन मुलांद्वारे केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. सन २०२०मध्ये दोन हजार ४५५ गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग होता. यात सुमारे ९ टक्के वाढ झाली. सन २०२१मध्ये ही संख्या दोन हजार ६४३वर पोहोचली. अर्थात एनसीआरबीने अद्याप सन २०२२ची आकडेवारी जाहीर केलेली नाही.
गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी
सन २०२० – २४५५
सन २०२१ – २६४३
सन २०२२ – २४५०
नुकत्याच घडलेल्या घटना
९ सप्टेंबर, २०२३- संगम विहार परिसरात आठ अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आठही जणांना पकडले आहे.
२९ मे, २०२३ – शाहबाद डेअरी परिसरात एका तरुणाने अल्पवयीन मुलीला चाकूने भोसकल्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली होती. पोलिसांनी आरोपीला बुलंदशहरामधून अटक केली होती.
२ मे, २०२३- जहांगीरपुरीमध्ये अल्पवयीनांच्या एका टोळीने एका अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या केली होती.
२२ सप्टेंबर, २०२२- गोविंदपुरीमध्ये विडी न दिल्याने संतापलेल्या अल्पवयीन मुलाने एका मुलावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली होती.