पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा निकाल लागला आहे. कल्याणीनगर येथे बेफाम वाहन चालवत दोन तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वेदांत अग्रवाल याचा जामीन फेटाळण्यात आला असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. बाल न्यायालयाने आपला निर्णय बदलला आहे.
या प्रकरणी बुधवारी सुनावणी पार पडली तेव्हा पोलिसांनी युक्तिवाद केला की, आरोपी वेदांत अल्पवयीन असला तरी तो नशेच्या आहारी गेला आहे. त्यामुळे त्याच्यापासून लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बाल न्यायालयाने वेदांतला बालसुधार गृहात ठेवण्याचा निकाल दिला.
मंगळवारी यासंदर्भात न्यायालयाने वेदांतला जामीन मंजूर केला होता. त्याने ट्राफिक कंट्रोलसाठी सहाय्य करावे, यासंदर्भात ३०० शब्दांचा निबंध लिहावा, व्यसनमुक्ती केंद्रात जावे, असे न्यायालयाने जामीन देताना म्हटले होते. त्यामुळे जनमानसात संताप व्यक्त होत होता.
न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त करत याच न्यायालयाकडे अपील केले असल्याचे सांगितले. त्याचा निकाल बुधवारी लागला. याआधी वेदांतचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक झाली. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा:
पवार, राहुल गांधींना लोणी का लावतायत?
बांगलादेशच्या खासदाराचा भारतात गूढ मृत्यू !
‘अमोलला बिनविरोध करण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता’
न्यायालय परिसरात विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकीचा प्रयत्न
हे प्रकरण घडले त्यादिवशी वेदांत हा १७ वर्षीय तरूण एका पबमध्ये मद्यप्राशन करून बाहेर पडला आणि त्याने आपली महागडी पॉर्षे गाडी बेफाम हाकली. त्याच्या कडे अर्थात परवाना नव्हता. त्याच दरम्यान बाईकवर स्वार एका युवक युवतीला त्याने उडवले. त्यात या दोघांचा मृत्यू झाला.