मुंबईतील शक्ती मिल कंपाउंड सामुहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपी आकाश जाधव उर्फ गोट्या याच्यावर ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आकाश उर्फ गोट्या याच्यावरील हा १२ वा गुन्हा दाखल झाला असून यापूर्वी त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात खून,खंडणी, हत्येचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. आकाश उर्फ गोट्या याने स्वतःची गॅंग तयार करून काही वर्षातच ही गँग नामचीन गॅंग म्हणून कुप्रसिद्धीच्या झोतात आली आहे. चिल्लर मध्ये हप्ते घेणारा आकाश उर्फ गोट्या याची टोळी आता लाखोंच्या खंडण्या वसूल करीत आहे. या टोळीमुळे मुंबई पोलीसांची डोकेदुखी वाढली आहे.
ताडदेव येथे वडाळा येथील विघ्नहर्ता पुनर्वसन प्रकल्पाच्या वादातून त्याच्या गुंडाने एका इव्हेंट मॅनेजरच्या हत्येची सुपारी घेतली होती. मात्र यामध्ये त्याच्या गुंडाने इव्हेंट मॅनेजरवर शस्त्राने हल्ला केला, मात्र त्यात इव्हेंट मॅनेजर बचावला असून त्याने ताडदेव पोलीस ठाण्यात आकाश उर्फ गोट्या आणि त्याच्या टोळीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आकाश उर्फ गोट्या आणि त्याच्या टोळीविरुद्ध हा १२ वा गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.
२०१३ मध्ये झालेल्या शक्तीमिल सामूहिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी त्यावेळी अल्पवयीन आरोपी आकाश उर्फ गोट्या जाधव याला या गुन्ह्यात बालन्यायालयाने तीन वर्षाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या आकाश उर्फ गोट्या हा पुन्हा गुन्हेगारीकडे वळला.
हे ही वाचा:
पोटात लपलेले ‘रहस्य’ अखेर डीआयआरने शोधलेच!
मोदी सरकारने आरक्षणाचा मार्ग मोकळा केला, आता ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी
त्याने गुन्हेगारी वृत्तीच्या काही तरुणांसोबत आग्रीपाडा, डिलाईल रोड परिसरात गुन्हेगारी कारवाया सुरु केल्या. दुकानदाराकडून हप्ता वसुली करणे, मारहाण, लूटमार या सारखे गुन्हे करण्यास सुरुवाट केली होती. २०१७ मध्ये आकाश याच्या विरुद्ध आग्रीपाडा आणि ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात ५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यामध्ये त्याला अटक देखील झाली होती. मात्र जामिनावर बाहेर पडल्यानंतर देखील त्याने आपली दहशत निर्माण करण्यास सुरुवात केल्यामुळे त्याच्या दहशतीला घाबरून त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यास कोणीही पुढे येत नव्हते. अखेर पोलिसांनी त्याला दोन वर्षासाठी मुबई,नवीमुंबई आणि ठाण्यातून तडीपार केले होते. तडीपारी भोगत असताना देखील मुबंईत त्याने आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरुच ठेवल्या होत्या.
तडीपारी नंतर गुन्हे
आकाश उर्फ गोट्या याला दोन वर्षांसाठी मुंबई पोलिसांनी मुंबइ,नवीमुंबई आणि ठाणे परिसातून तडीपार केले होते, या तडीपारीनंतर देखील आकाश उर्फ गोट्या हा डिलाईल रोड, आग्रीपाडा परिसरात गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी येत होता, तडीपारीनंतर देखील त्याच्याविरुद्ध दोन गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यानंतर आर ए के पोलीस ठाण्यात खुनाचा तिसरा गुन्हा दाखल झाला आले. पूर्वी आग्रीपाडा येथे राहणारा आकाश उर्फ गोट्या याचे घर एसआरए मध्ये गेल्यानंतर त्याचे कुटुंब भाडेतत्वावर भांडूंप येथे राहण्यास गेले होते. मात्र मुलाच्या या कृत्यामुळे कुटुंब डोंबिवली येथे राहण्यास गेले. आग्रीपाडा परिसरात लहानाचा मोठा झालेला आकाश उर्फ गोट्या शक्तीमिल प्रकरणांतून तुरुगांतून बाहेर आल्यानंतर आपली स्वतःची टोळी तयार करून त्याने आग्रीपाडा आणि डिलाईल रोड परिसरात गुन्हे करण्यास सुरुवात करत आपली दहशत निर्माण केली होती.
शक्तीमिल प्रकरण
महालक्ष्मी येथील बंद पडून भग्नावस्थेत गेलेल्या शक्तीमिल कंपाउंड मध्ये एका फोटोजर्नालिस्ट तरुणीवर ३१ जुलै २०१३ मध्ये सामूहिक अत्याचार झाला होता. या सामूहिक अत्याचाराच्या गुन्हयात इतर आरोपींसह आकाश उर्फ गोट्या याला देखील अटक कऱण्यात आली होती. मात्र आकाश त्यावेळी १७ वर्षाचा असल्यामुळे त्याच्यावर बालन्यायालयात खटला चालवण्यात आला होता. या गुह्यातील इतर ५ आरोपींना २० मार्च २०१४ रोजी सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते. ४ एप्रिल २०१४ रोजी त्यापैकी तीन जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती व दोघांना जन्मठेपची शिक्षा सुनावली होती. आकाशला बालन्यायालयाने ३ वर्षाची शिक्षा सुनावली होती व त्याची रवानगी नाशिक सुधारगृहात करण्यात आली होती. २०१७ साली आकाश हा तीन वर्षाची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडला होता.