आठ वर्षांपूर्वी झालेल्या अंबरनाथ येथील एका महिलेच्या हत्येप्रकरणात अल्पवयीन मुलीसह तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी तेव्हा एमबीए करत असलेल्या महिलेसह दोघांना सोमवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
कल्याण येथील सत्र न्यायालयाने हा आदेश दिला. १७ ऑक्टोबर २०१४ रोजी स्नेहल उमरोडकर या गळा चिरलेल्या अवस्थेत आणि सोन्याचे मंगळसूत्र गायब असलेल्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. त्यानंतर, तीन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यात तेव्हा २२ वर्षांचा असणारा आणि अंबरनाथमधील कॉलेजात बीकॉमला असणारा वीरेंद्र नायडू, तेव्हा एमबीए करणारी २२ वर्षांची अश्विनी सिंग आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाचा समावेश होता. हे सर्व अंबरनाथचे रहिवासी आहेत.
वीरेंद्र नायडू आणि स्नेहल यांचा मुलगा आदित्य बालपणीपासूनचे मित्र होते. मात्र वीरेंद्रने त्याच्या इतर दोन मित्रांसोबत स्नेहल यांच्या हत्येचा कट रचला होता. नायडू कॉलेजात एका विषयात वारंवार अनुत्तीर्ण होत होता. त्यामुळे लाच देऊन गुणांमध्ये फेरफार करण्यासाठी त्याला रोख रकमेची गरज होती. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळेच त्याने स्नेहल यांची हत्या करण्याचा कट आखला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नायडू हा आदित्यचा बालपणीचा मित्र होता. नायडू हा आदित्यच्या घरी नियमित भेट देत असे. हत्येच्या दिवशी त्याने आदित्यशी गप्पा मारून त्या ओघात आई घरी एकटी कधी असते, हे जाणून घेतले होते. तसेच, घरातील इतर कुटुंबीय तेव्हा कुठे असतात, याचीही माहिती काढून घेतली होती, असे पोलिसांनी सांगितले. हत्येच्या दिवशी हे तिघे उमरोडकर यांच्या घरी हातमोजे घालून आले. त्यांनी स्नेहल यांना बांधून ठेवले आणि त्यांचा गळा चिरला. हत्येच्या दिवशी आदित्य हा मुलुंड येथे एका नातेवाईकाच्या घरी गेला होता तर त्याचे वडील विवेक काही कामानिमित्त बाहेर गेले होते.
रात्री ९.१५च्या सुमारास विवेक घरी परतले तेव्हा त्यांनी दार उघडले असता, त्यांना त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिचा चष्मा तुटला होता, तोंडाला टेप लावली होती, हात बांधले होते. तसेच, धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला होता. तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गहाळ होते.
हे ही वाचा:
देवेंद्र फडणवीस म्हणाले; बंजारा समाजाच्या विकासासाठी सरकार सदैव पाठीशी !
संभाजीनगरचे नागरीक तहानलेले; पण आयुक्तांच्या वाढदिवसावर पाण्यासारखा पैसा खर्च
हैदराबादमध्ये आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण, मग खाणीत फेकले, बीआरएस कार्यकर्त्याचा पती आरोपी
कसे होते पंतप्रधान मोदी यांचे आजवरचे अमेरिका दौरे?
सरकारी वकील म्हणून सचिन कुलकर्णी तर, संजय गोसावी यांनी आरोपींची बाजू मांडली. सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने नायडू आणि सिंग यांना हत्या केल्याबद्दल पाच हजार रुपये दंड आणि दरोड्यासाठी दोन हजार रुपयांच्या दंडासह १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपींकडून दंडाची वसुली झाल्यास ती हत्या झालेल्या महिलेच्या मुलाकडे सोपवावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.