उच्च शिक्षित आणि एनआरआय नागरिकांसाठी लग्नाची स्थळे सुचवणाऱ्या जुहू येथील एका महिलेला जिल्हा मंचाने ग्राहकाची अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे ५५ हजार ग्राहकाला देण्याचे आदेश दिले आहेत. मॅचमेकर प्रिया शाह हिला परेल येथील एका ग्राहकाला पाच हजार रुपये नुकसान भरपाईही द्यावी लागणार आहे.
सेवा शुल्क घेऊनही मनासारखी सेवा न मिळाल्यामुळे यासंदर्भातील तक्रार २९ एप्रिल २०१३ रोजी शहा यांच्याविरोधात मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाकडे करण्यात आली होती. शहा यांनी महिन्याला १५ स्थळे सुचवण्याचे वचन दिले होते. तसेच लग्न ठरण्यापर्यंतची सर्व जबाबदारी पार पाडण्यात येईल, असेही सांगितले होते. त्यामुळे सेवेसाठी तक्रारदार व्यक्तीच्या वडिलांनी त्यासाठी ५५ हजारांचा धनादेश १६ जुलै २०१२ ला दिला होता.
हे ही वाचा:
… म्हणून ठाण्यात भरले खड्ड्यांचे प्रदर्शन!
पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!
… आणि सायबर पोलिसांनी शोधल्या शेकडो गहाळ वस्तू
आरोग्य विभागाच्या महाभरतीचा महागोंधळ!
पैसे देऊनही प्रिया यांच्याकडून योग्य सेवा मिळत नसल्यासंबंधीच्या तक्रारीचे ई- मेल तक्रारदार व्यक्तीकडून २०१२ वर्षीच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाठविण्यात आले होते. पैसे परत मिळवण्यासाठीही शहा यांना मेल केले होते. मात्र, या मेलना शहा यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने ग्राहकाने ही तक्रार ग्राहक मंचाकडे केली.
शहा यांच्या व्हिजिटिंग कार्डवरून त्या स्थळ सुचवण्याचे काम करतात हे स्पष्ट आहे आणि ग्राहकांनी केलेले मेल पाहता तक्रारीत तथ्य आहे, त्यामुळे शहा या ग्राहकांना सेवा देण्यास कमी पडल्या, असे मंचाने सांगत शहा यांना ग्राहकाचे ५५ हजार परत करण्याचे आदेश दिले आहेत. एका महिन्यात हे पैसे परत न केल्यास ९ टक्के व्याजदराने ते द्यावे लागतील असे मंचाने सांगितले आहे.