जम्मू काश्मीरमध्ये आदिल फारूक भट्ट नामक एका पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. आदिलकडे पोलिसांना दोन हॅन्ड ग्रेनेड्स सापडली आहेत. त्यामुळेच अवैधरित्या स्फोटके बाळगण्याच्या प्रकरणावरून आदिलला अटक करण्यात आली. आदिल फारूक भट्ट हा जम्मू काश्मीरमधील एका स्थानिक वृत्तसंस्थेसाठी पत्रकार म्हणून कार्यरत आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांनी मंगळवार, १० ऑगस्ट रोजी धडक कारवाई करताना काश्मीरमधील लाल चौक परिसरातून आदिल फारूक याला अटक केली. त्याचे वय २६ वर्षे असून, तो दक्षिण काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्याचा रहिवासी असल्याची माहिती समजते. तर तो जम्मू काश्मीरमधील सीएनएस या वृत्तसंस्थेसोबत उपसंपादक म्हणून कार्यरत होता अशी माहिती पुढे येत आहे.
काल १० ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे हरी सिंह हाय स्ट्रीट या भागात भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात काही सामान्य नागरिक हे जखमी झाले होते. या हल्ल्यानंतरच पत्रकार अब्दुल फारूक याला अटक करण्यात आली आहे. त्याचा या हल्ल्याशी काही संबंध होता का? हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.
हे ही वाचा:
राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
औरंगाबाद महापालिकेतही होता तळीरामांचा अड्डा?
छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी
२०१९ सालीही झाली होती अटक
आदिल फारूक याला २०१९ साली देखील अटक करण्यात आली होती. तेव्हा तो पत्रकारितेचा विद्यार्थी होता. त्यावेळी त्याला नागरी सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयात पोलिसांनी आधी काही कागदपत्रे सादर केली होती ज्यामध्ये फारूक हा लष्कर-ए-तैबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे म्हटले होते. त्यावेळी आदिल फारुकच्या अटकेनंतर काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांनी त्याच्या सुटकेसाठी मोहीम चालवली होती.