जिंदल स्टील या नामांकित कंपनीचे वरीष्ठ अधिकारी आणि जिंदल स्टिलच्या ओमान येथील व्हल्कन ग्रीन स्टील या कंपनीचे सीईओ दिनेश कुमार सरोगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने विमान प्रवासादरम्यान लैंगिक छळ केल्याचा आरोप केल्यानंतर सीईओ दिनेश सरोगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने देखील त्यांच्यावर कारवाई करत कंपनीतून पायउतार होण्यास सांगितले आहे. पीडित तरुणीने ट्विटरवर पोस्ट टाकल्यानंतर या घटनेची माहिती समोर आली.
पीडित तरूणी अनन्या छोछरिया हिने ट्विटरवर पोस्ट करत म्हटले की, इतिहाद कंपनीच्या विमानाने कोलकाताहून अबू धाबीला जात होती. अबू धाबीहून तिला लंडनची कनेक्टेड फ्लाईट पकडायची होती. माझ्या शेजारी जिंदल कंपनीचे सीईओ दिनेश सरोगी बसले होते. त्यांचे वय जवळपास ६५ पर्यंत असावे. त्यांनी मला त्यांच्याबद्दल माहिती दिली आणि माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आमचा संवाद पुढे जात असताना त्यांनी माझे छंद काय आहेत, हे जाणून घेतले. ते म्हणाले की, तुला चित्रपट पाहायला आवडतात का? मी हो म्हटल्यानंतर त्यांनी त्यांचा फोन बाहेर काढला आणि त्यावर काही चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले. फोन आणि इअरफोन बाहेर काढून त्यांनी मला पॉर्न व्हिडीओ दाखविले आणि मला जवळ ओढायला लागले. या प्रकारामुळे मला धक्काच बसला आणि भीतीही वाटली.
हे ही वाचा..
एक दिवस मराठेच जरांगेंची गोधडी हिसकावून घेतील…
केदारनाथ पदयात्रा मार्गावर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू !
बांगलादेश हिंसाचार; ‘दिसताच क्षणी गोळ्या घाला’
ग्रँटरोडमधील व्यवसायिकाला बनावट शिल्पे विक्रीकरुन २२ लाखांची फसवणूक
तिने पुढे सांगितले की, मी भयभीत होऊन वॉशरुमचा बहाणा करून त्यांच्या तावडीतून निसटले. याबाबत एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांना तक्रार केली. तसेच अबू धाबीमधील पोलिसांनाही याची माहिती दिली. विमान उतरताच त्यांनी सीईओंना ताब्यात घेतले, असे तरुणीने सांगितले. पीडित तरुणीने नवीन जिंदल यांना टॅग करून तक्रार केल्यानंतर त्यांनीही याचा निषेध व्यक्त केला आणि कारवाई करत कंपनीतून पायउतार होण्यास सांगितले. पीडितेच्या कुटुंबांच्या तक्रार दाखल केल्यानंतर कोलकाता येथील विधाननगर शहर पोलिसांनी रविवारी (२१ जुलै) सीईओ दिनेश सरोगी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.