झारखंड रोख रक्कम जप्तीचे प्रकरण; १० हजार रुपयांच्या लाचेच्या मागावरून कोट्यवधींची वसुली

चौकशीदरम्यान, भ्रष्टाचाराचे गुंतागुंतीचे जाळे ईडीसमोर उघड

झारखंड रोख रक्कम जप्तीचे प्रकरण; १० हजार रुपयांच्या लाचेच्या मागावरून कोट्यवधींची वसुली

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)जेव्हा झारखंड ग्रामीण विकास विभागातील मुख्य अभियंता वीरेंद्र राम याला गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक केली, तेव्हा त्याच्याकडून किती मोठे खुलासे होतील, याची अधिकाऱ्यांना अपेक्षा नव्हती. केवळ १० हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून राम याला अटक करण्यात आली होती.

चौकशीदरम्यान, रामने भ्रष्टाचाराचे एक गुंतागुंतीचे जाळेच ईडीसमोर उघड केले. ज्यामध्ये केवळ तो स्वतःच नव्हे तर, अनेक अधिकारी गुंतले होते. विविध माध्यमांद्वारे विशेषतः निविदा प्रक्रियेदरम्यान ही लाचेची रक्कम घेतली जात होती, असे चौकशीत उघड झाल्यावर ईडीने सविस्तर तपास सुरू केला. वेगवेगळ्या स्रोतांकडून जमा केलेल्या गुप्त माहितीसह रामचे दावे पडताळून पाहिले. त्यानंतरच्या चौकशीत झारखंडच्या ग्रामीण विकास विभागातील भ्रष्टाचाराचे व्यापक स्वरूप उघड झाले. ईडीने गेल्या वर्षी ९ मे रोजी राज्य सरकारला एक गोपनीय पत्र पाठवण्यास प्रवृत्त करून त्वरित कारवाईची विनंती केली.

मात्र, हा गोपनीय पत्रव्यवहार कथितपणे रडारवर असलेल्या व्यक्तींच्या हाती सापडला. त्यामुळे राज्य अधिकाऱ्यांनी या अहवालाला फारसा गंभीर प्रतिसाद दिला नाही. ‘वीरेंद्र राम याच कोठडीत चौकशी केली असता, त्याने कंत्राटदारांकडून निविदाप्रक्रियेदरम्यान कमिशनच्या नावावर लाच घेत असल्याचे उघड केले. त्याने १४ एप्रिल २०२३ रोजी नोंदवलेल्या जबाबात कमिशनची रक्कम घेतल्याचा खुलासा केला. कंत्राटदारांकडून एकूण निविदा मूल्याच्या ३.२ टक्के पैसे घेण्यात आले, त्यात त्याचा वाटा ०.३ टक्के होता,’ असे इंडिया टुडेने मिळवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

सबळ पुराव्यांच्या आधारे ईडीने ६ मे २०२४ रोजी ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्यासह प्रमुख संशयितांना लक्ष्य करून छापे टाकले. लाल यांच्यावर कथितपणे कंत्राटांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या विभागात किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता, याचेच पुरावे ईडीला मिळाले आहेत. लाल यांचे सहकारी, जहांगीर यांच्या निवासस्थानी, अधिकाऱ्यांनी ३४ कोटी रुपयांपेक्षा अधिक बेहिशेबी रोकड शोधून काढली. या रकमेची मोजणी अद्याप सुरू आहे.

हे ही वाचा:

ममता बॅनर्जी यांच्याबद्दलचे मीम पोस्ट करणाऱ्याला कोलकाता पोलिसांचे समन्स

“राहुल गांधींना राम मंदिराचा निकाल उलथवायचा होता”

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाहांनी बजावला मतदानाचा हक्क!

पूंछ हल्ल्याप्रकरणी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी, २० लाखांचे बक्षीस जाहीर!

याव्यतिरिक्त, तीन कोटी रुपये अन्य व्यक्तीच्या आवारातून जप्त करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी झडतीदरम्यान जप्त केलेल्या कागदपत्रांचा संबंध मंत्री आलमगीर आलम यांच्याशी असल्याने लवकरच त्यांची चौकशी केली जाणार आहे.

Exit mobile version