बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सत्ताधारी जनता दल पक्षाच्या एका नेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली. बिहारची राजधानी पाटणा येथील पुनपुन परिसरात ही हत्या झाल्यानंतर लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. गुरुवारी सकाळी ही घटना घडल्यानंतर संतप्त जमावाने पाटणा-पुनपुन रस्ता अडवून गोंधळ घातला.
पाटणातील पुनपुनमधील पैमार गावाजवळ बेलडिया पुलाजवळ जदयूचे नेते सौरभ कुमार यांची हत्या करण्यात आली. तर, त्यांचा एक मित्र मुनमुन कुमार गोळीबारात जखमी झाला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराची माहिती कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. तर, हत्येची बातमी समजताच गावातील संतप्त गावकरी रस्त्यांवर उतरले. लोकांनी पाटणा-पुनपुन मार्ग रोखून निदर्शने केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
‘डीआरडीओ’ने बनविले भारतीय सैन्यासाठी विशेष ‘बुलेट प्रूफ जॅकेट’
रेल्वेच्या जनरल डब्यातील प्रवाशांचा जेवणाचा प्रश्न मिटला, अवघ्या २० रुपयांत मिळणार जेवण!
लाईट बिल जास्त आल्याने महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने १६ वार!
जदयू नेता सौरभ कुमार बुधवारी रात्री उशिरा बढइयां कोल गांवात मित्र अजीत कुमारच्या भावाच्या रिसेप्शन पार्टीला गेले होते. ते रात्री १२ वाजता रिसेप्शन पार्टीवरून एक मित्र मुनमुन कुमारसोबत घरी परतत होते. सौरभ कुमार स्वतःच्या गाडीत बसत असताना, दुचाकीवर आलेल्या बंदुकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सौरभ कुमार यांच्या डोक्यात तर, त्यांचा मित्र मुनमुन यांचे पोट आणि हाताला जखमा झाल्या. या दरम्यान गुन्हेगार फरार झाले. याबाबत कळताच आजूबाजूच्या लोकांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सौरभ कुमारला मृत घोषित केले. तर, जबर जखमी झालेले मुनमुन कुमार यांची प्रकृती चिंताजनक आहे.