जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे मोठी कारवाई करत सुरक्षा दलांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टंट फ्रंटच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.खुर्शीद अहमद आणि रियाझ अहमद अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. दोघेही बारामुल्ला येथील जंदपाल कुंजर येथील रहिवासी आहेत.
बारामुल्ला पोलिसांना कुंजर गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिस आणि सीआरपीएफच्या १७६ बटालियनच्या पथकाने संयुक्तपणे गावात शोध मोहीम सुरू केली. कारवाईदरम्यान दोन संशयितांना अटक करण्यात आली.त्यांच्या ताब्यातून एके ४७ मॅगझिन आणि काडतुसे जप्त करण्यात आल्या आहेत. झडतीदरम्यान बंदी घालण्यात आलेल्या रेसिडेंट फ्रंट संघटनेची पोस्टर्सही जप्त करण्यात आली आहेत.
या अवैध दारूगोळ्याचा वापर आसपासच्या परिसरात दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जाणार होता असे दहशतवाद्यांनी चौकशीच्या वेळी सांगितले. परंतु त्याच्याच आधी पोलिसांनी त्यांची धरपकड केली आहे. पोलिसांनी या सर्वांना अटक करून कुंजर पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्र आणि यूएपीए कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हे ही वाचा:
औरंग्या बुडाला पण पिलावळीचं काय?
आनंद द्विगुणित करणारा रंगांचा सण “होळी”
आरएसएसच्या पुढाकाराने गर्भात वाढणारे बाळ शिकणार ‘भारतीय संस्कृती’
इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना राष्ट्रीय तपास संस्थेने शुक्रवारी काश्मीरमधील बारामुल्ला येथील दहशतवादी बासित अहमद रेशीची मालमत्ता जप्त केली होती. श्रीनगरमधील अल-उमर मुजाहिदीनचा संस्थापक आणि मुख्य कमांडर मुश्ताक जरगर उर्फ लतराम याची मालमत्ता जप्त केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.दहशतवादी बासित यापूर्वी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता आणि नंतर तो पाकिस्तानात गेला. सध्या तो द रेझिस्टन्स फ्रंट च्या दहशतवादी कारवायांमध्ये आणि सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पुरवण्यामध्ये सहभागी होता .