जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी अब्दुल रजाक या व्यक्तीची गोळी झाडून हत्या केली. थानामंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुंडा टॉप गावातील मशिदीबाहेर आला असताना त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. रझाकचा भाऊ प्रादेशिक लष्करात सैनिक आहे. या प्रकरणानंतर परिसरातील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली असून परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
घटना घडल्यानंतर सुरक्षारक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दहशतवाद्यांना पकडण्यासाठी तपास सुरू केला तसेच, जमावबंदी लागू केली. दहशतवाद्यांनी रझाकवर जवळून गोळीबार केला होता. याआधी अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी १७ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी बिहारच्या एका श्रमिकाची गोळी झाडून हत्या केली होती. दहशतवाद्यांनी बिजबेहरा परिसरातील जबलीपोरामध्ये राजा शाह याच्यावर जवळून गोळीबार केला होता. यात जबर जखमी झालेल्या राजा याला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. त्याच्या मानेवर दोन आणि पोटावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
हे ही वाचा:
केक खाल्ल्याने मुलीचा मृत्यू; पंजाबच्या बेकरीतील केकमध्ये सिंथेटिक स्वीटनरचे अधिक प्रमाण!
‘पराभवानंतर मला जिंकू असे वाटले होते’
परेड सरावादरम्यान मलेशियन नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर; १० जणांचा मृत्यू
ऍरिझोना येथील गाडी अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी याबाबत शोक व्यक्त केला होता. ‘बिजबेहरा येथे झालेल्या हत्येचा मी कठोर निषेध व्यक्त करतो. हे सर्व थांबले पाहिजे. लोकांना शांतता हवी आहे, परंतु दहशतवाद्यांना शांती नको आहे. आपल्याला या विरुद्ध एकजूट व्हावे लागेल,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तर, मेहबुबा मुफ्ती यांनीही हिंसाचाराच्या या संवेदनाहीन कृत्याचा निषेध केला होता. कुटुंबाप्रति मी सहवेदना व्यक्त करते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.