पंजाब मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाबमधील फिरोजपूर कारागृहातल्या एका कैद्याच्या पाठीवर लोखंडी सळई गरम करून पंजाबी भाषेत ‘गँगस्टर’ असे लिहिण्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीचा आरोप आहे की, जेलच्या काही कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने हे कृत्य केले आहे. आई-वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कपूरथळा येथे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले आणि पोलिसांकडून तपास अहवाल मागवला आहे.
फिरोजपूर मधील तरसेम नावाच्या कैद्यावर हत्येचा एकच आरोप होता. मात्र त्याच्यावर खोटे हत्या आणि चोरीचे एकूण १० ते १५ आरोप करण्यात आले आहेत. तरसेम म्हणाला कारागृहात खूप वाईट पद्धतीने मारहाण केली गेली. लोखंडी सळई गरम करून तरसेमच्या पाठीवर ‘गँगस्टर’ असं लिहिण्याचा प्रकार कारागृहातील अधिकाऱ्यांनी केला. मी वेदनेने कळवळत होतो तरीही पोलीस कर्मचाऱ्यानी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. असे आरोप त्यांनी केले, मात्र अधिकाऱ्यांना त्याचा काहीही परिणाम झाला नाही. या घटने नंतर तरसेमच्या आई-वडिलांनी त्याच्या मुलाच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले व ते म्हणाले की माझ्या मुलाला न्यायालयात आणण्यासाठी पोलिस टाळाटाळ करत होते.
तरसेमच्या आई-वडिलांनी माझा मुलगा तुरुंगात गेला तेव्हा त्याच्यावर एकच गुन्हा दाखल होता, मात्र आता त्याच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असे सांगितले. यासोबतच त्याच्या पाठीवर ‘गँगस्टर’ असे लिहिल्याचेही त्यांनी सांगितले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, आरोपीने टी-शर्ट काढून पाठ न्यायाधीशांना दाखवली असता, न्यायाधीशांनाही धक्का बसला. न्यायाधीश राकेश कुमार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, तरसेमचे वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी २४ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही भर्ती व्हायचे होते लष्करात
कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट
दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेणार मागे
ती बोट इंजिन बंद पडल्याने भरकटली आणि हरिहरेश्वरला आली
न्यायालयाच्या आदेशानंतर तरसेमला कपूरथळा येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय आणि संपूर्ण शरीर तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याचा अहवाल बंद लिफाफ्यात पोलिसांना सादर करण्यात आला आहे. या प्रकरणी डॉक्टरांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.