महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससाठी शुक्रवारचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या जामीन अर्जावर शुक्रवारपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. शुक्रवारी जामीन अर्ज फेटाळला तर त्याला तुरुंगात जावे लागू शकते. त्यामुळे जॅकलिनवरची टांगती तलवार कायम आहे.
सध्या या प्रकरणी अभिनेत्रीला अंतरिम जामीन मिळाला आहे. त्याचवेळी, गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने सुनावणीदरम्यान जामीन अर्जाला विरोध करत सांगितले की तिने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने तपासात सहकार्यही केले नाही. अशा स्थितीत जॅकलिनला जामीन मिळू नये असे अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
अफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा
अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली
आयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात
गुरुवारी सकाळी जॅकलिन फर्नांडिस दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली. कोर्टात जॅकलिनच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्याचवेळी, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने जॅकलिन फर्नांडिसच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला. जॅकलिन गेल्या महिन्यात २२ऑक्टोबर रोजी पटियाला उच्च न्यायालयात हजर झाली होती. त्यावेळी न्यायालयाने तिला दिलासा देत अंतरिम जामीन १० नोव्हेंबरपर्यंत वाढवला होता. मात्र, जॅकलिनला जामीन देण्यास ईडीने सातत्याने विरोध केला आहे.
जॅकलिनच्या अर्जाला विरोध
अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेत्री जॅकलिनच्या नियमित जामीन अर्जाला विरोध केला आहे. जॅकलिनने तपासात कधीही सहकार्य केले नाही असे अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणणे आहे. सुकेशने अभिनेत्रीला भेटल्यानंतर काही दिवसांतच त्याच्या गुन्हेगारी इतिहासाविषयी सांगितले होते. असे असूनही, ती सुकेशच्या जवळ गेली. जॅकलीन स्वत: एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे, तिच्या कडे पैशांची कमतरता नाही असे अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे . या अभिनेत्रीने तपासादरम्यान कबूल केले की तिने इतर लोकांना पुराव्याशी छेडछाड करण्यास, पुरावे नष्ट करण्यास सांगितले होते. त्यामुळे मनी लाँड्रिंगशी संबंधित सर्व आरोपी तुरुंगात असताना जॅकलिन फर्नांडिसला जामीन का द्यावा, असा युक्तिवाद अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयात केला.