दहशतवादविरोधी पथकाच्या सूत्रांकडून कळली माहिती
दिल्ली पोलिसांनी ज्या सहा दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे, त्यातील मुंबईचा जान मोहम्मद हा निव्वळ एक प्यादा असून त्याने केवळ पैशासाठी हे काम केले असावे, त्याच्या संपर्कात दाऊद टोळीतील मुंबईतील एक मोठी व्यक्ती असण्याची शक्यता असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. एटीएसच्या सूत्रांच्या या दाव्यामुळे दाऊद टोळीचाही यात सहभाग आहे याला पुष्टी मिळत आहे. तसेच जान मोहम्मदला आर्थिक रसद देखील मुंबईतूनच पुरवली जात असावी याचा देखील उच्च पातळीवर तपास सुरू आहे, असेही एटीएसने म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी या सहाजणांना ताब्यात घेतल्यानंतर आणि मुंबईत जान मोहम्मदच्या घरी जाऊन चौकशी केल्यानंतर दहशतवादविरोधी पथक खडबडून जागे झाले आणि आता आपले अपयश झाकण्यासाठी एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या तपासाची माहिती पत्रकारांना दिली, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
मुंबईत अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनिस इब्राहिम यांच्या संपर्कात असणारे अनेक बड्या व्यक्ती आहेत, या व्यक्तीवर एटीएस आणि गुन्हे शाखेने लक्ष केंद्रित केले आहे. जान मोहम्मद याच्या संपर्कात अनिस इब्राहिम यांच्या संपर्कात असणारी व्यक्ती जान मोहम्मदच्या संपर्कात असण्याची शक्यता एटीएस सूत्रांनी वर्तवली आहे.
जान मोहम्मद याच्यावर २० वर्षांपूर्वी मुंबईतील पायधुनी येथे गोळीबाराचा गुन्हा दाखल आहे. हा गोळीबार त्याने दाऊद टोळीच्या संगण्यावरून केल्याचे समजते. तेव्हा पासून तो दाऊद टोळीच्या काही गुंडाच्या संपर्कात असावा, अशी शक्यता एटीएस कडून वर्तवली जात आहे.
एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी सांगितले की, जान मोहम्मद याला निजामुद्दीन एक्स्प्रेसचे तिकीट देणाऱ्या सायन येथील एजंटकडे चौकशी केली असता त्याने प्रथम ९ सप्टेंबर रोजीचे गोल्डन टेम्पल या ट्रेनचे तिकीट काढले होते. मात्र ते तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे १३ तारखेचे तात्काळ तिकीट काढून ते देखील वेटिंगवर होते, मात्र १३ तारखेला ते तिकीट कन्फर्म झाले, असे उघड झाले.
जान मोहम्मद याची पत्नी आणि मुलीकडे याबाबत चौकशी करण्यात आली असून तात्पुरता त्याना याबाबत काहीही माहीत नसल्याचे समोर आले आहे. तसेच चौकशीत जान मोहम्मदबाबत इतर काही माहिती मिळाली. त्या संदर्भात तपास सुरू असल्याचे अग्रवाल यांनी म्हटले आहे.
जान मोहम्मद याच्यावर अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. त्या बाबत देखील तपास सुरू असल्याचे एटीएस प्रमुख अग्रवाल यांनी सांगितले. जान मोहम्मद याला अटक करण्यात आली, त्या वेळी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र सापडलेले नाही. इतर गोष्टी आमच्याकडे एफआयआरची कॉपी आल्यानंतर स्पष्ट होईल. असे देखील अग्रवाल यांनी म्हटले आहे. जान मोहम्मद वर २० वर्षांपूर्वी असलेल्या गुन्ह्याशी आणि आताच्या गुन्ह्याशी काहीही संबध नसून त्याने मुंबईत कुठल्याही प्रकरणाची रेकी केलेली नसल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
दहशतवाद्यांना अटक हा गंभीर मुद्दा, यांना वेळीच संपवायला हवं
जावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही!
टेलिकॉम क्षेत्रात आता करता येणार १००% परकीय गुंतवणूक
बापरे! गेल्यावर्षीपेक्षा यंदा वाघाच्या हल्ल्यातील मृतांची संख्या अधिक…वाचा
दिल्ली पोलीस जे करू शकले नाही ते आम्ही करू असे नाही आम्ही एकत्र काम करू, आम्हाला या गुन्ह्यासंदर्भात जी काही माहिती मिळाली ती दिल्ली पोलिसांशी समन्वय साधून त्याच्यावर एकत्र काम करू ती माहिती माध्यमाना देता येणार नसल्याचे अग्रवाल यांनी म्हटले.
कर्जबाजारी जान मोहम्मद
जान मोहम्मद उर्फ समीर कालिया कर्जबाजारी झाला होता, त्यात त्याची नोकरी गेली होती. दरम्यान, त्याने बँककर्ज काढून एक टॅक्सी घेतली होती. त्यात देखील त्याला यश आले नाही, बँकेचे हप्ते थकल्यामुळे बँकेने टॅक्सी देखील ओढून नेली होती. घर चालवण्यासाठी त्याने पुन्हा कर्ज काढले होते. कर्जाचा डोंगर त्याच्या डोक्यावर होता, अशी माहिती तपासात समोर आल्याचे अग्रवाल यांनी संगीतले. आम्ही दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून महाराष्ट्र एटीएसचे एक पथक दिल्लीला जाणार आहे. जान मोहम्मद याच्याबाबत अधिक चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी पत्रकारांना दिली.