दिल्लीच्या विशेष विभागाच्या पोलिसांनी पकडलेल्या आयएसआयएसचा संशयित दहशतवादी रिझवान अश्रफ याची प्रयागराजमध्ये चौकशी सुरू आहे. रिझवान हा नैनीमध्ये राहात होता आणि अनेक मौलाना आणि मदरशांमधील शिक्षकांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली असून पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. त्यामुळे रिझवानने येथे कोणते मॉड्युल तर तयार केले नव्हते ना, याचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिसांच्या विशेष पथकाने नैनी येथे पोहोचून तपासाला सुरुवात केली आहे. तिथे तो बराच काळ वास्तव्य करत असलेल्या घराचीही कसून तपासणी केली जात आहे. त्यादृष्टीने नैनी येथील मशिदीतील मौलवी आणि मदरशांमधील शिक्षकांचीही माहिती घेतली जात आहे. याबाबत ठोस पुरावे मिळाल्यानंतरच कारवाई केली जाणार आहे.
रिजवान हा बराच काळ प्रयागराजमध्ये राहात होता, हे त्याच्या अटकेनंतर स्पष्ट झाले आहे. मात्र नैनीव्यतिरिक्त तो अन्य कोणत्या ठिकाणी राहात होता आणि कोणत्या परिसरात राहात होता, प्रयागराजमध्ये येऊन त्याने काय केले, याचा शोध पोलिस घेत आहेत.
हे ही वाचा:
मुंबई पोलिसांकडून ३०० कोटींचा एमडी जप्त
गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर
गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी
दिल्ली पोलिसांनी सोमवारी एनआयएने मोस्ट वाँटेड म्हणून जाहीर केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक शाहनवाझ उर्फ शैफी उज्जमासोबत तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. शाहनवाझ आणि त्यांच्या दोन साथीदारांचा दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या पुणे मॉड्युलशी संबंध असल्याचे मानले जात आहे. पेशाने इंजिनीअर असलेला शाहनवाझ पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता आणि दिल्लीत राहात होता. त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पोलिसांनी शाहनवाझ राहात असलेल्या घरातून आयईडी बनवण्यासाठी वापरली जाणारी सामग्री जप्त केली होती.