पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली गुजरातमधील भरूच जिल्ह्यात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. भरूचमधील अंकलेश्वर येथील रहिवासी असलेल्या प्रवीण मिश्रा याच्यावर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस म्हणजेच आयएसआयसाठी भारतीय सशस्त्र दल आणि संरक्षण संशोधन संस्थांबद्दल गुप्त माहिती गोळा केल्याचा आरोप आहे.
गुजरात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटच्या (CID) म्हणण्यानुसार, आयबीएम चंदीगडसाठी काम करण्याचा दावा करणारी सोनल गर्ग नावाची महिला म्हणून आयएसआय ऑपरेटिव्हने रचलेल्या हनी ट्रॅपला प्रवीण मिश्रा बळी पडला. त्याला लक्ष्य करण्यासाठी म्हणून पाकिस्तानी ऑपरेटरने भारतीय व्हॉट्सअप नंबर आणि सोनल गर्गच्या बनावट फेसबुक आयडीचा वापर केला.
सीआयडी एडीजीपी राजकुमार पांडियन म्हणाले की, “सोनल गर्ग हिने हैदराबादमध्ये एका संस्थेत काम करणाऱ्या प्रवीण मिश्रा याला हनी ट्रॅप केले. तिने भारताच्या संरक्षणाशी संबंधित माहिती काढण्यासाठी प्रवीण मिश्राला लक्ष्य केले होते. पुढे प्रवीण मिश्रा याने काही महत्त्वाची माहिती तिच्याशी शेअरही केली होती.” या माहितीमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारे (डीआरडीओ) निर्मित ड्रोनच्या तपशीलांचा समावेश आहे. मिश्रा यांच्या ऑफिस सर्व्हरवर मालवेअर इन्स्टॉल करण्याचा प्रयत्नही आयएसआय ऑपरेटरने केला होता, अशी माहिती आहे.
हे ही वाचा:
त्या जहाजावरील भारतीय सुटले! इराणने पाच भारतीय खलाशांना सोडले
हिंदू दहशतवादाचे पितृत्व पवारांचेच, ले.कर्नल पुरोहीतांचा गौप्यस्फोट!
‘दाऊद टोळी ड्रग्सच्या धंद्यात अजूनही सक्रिय’
निवडणुकीसाठीचा प्रचार हा मूलभूत अधिकार नाही, म्हणत केजारीवालांच्या जामीनाला ईडीकडून विरोध
प्रवीण मिश्रा, सोनल गर्ग ही बनावट ओळख वापरणारा पाकिस्तानी ऑपरेटर आणि कटात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.