अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्ची याच्यासंबंधी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने इक्बाल मिर्चीची गिरगावातील मालमत्ता जप्त केली आहे. इक्बाल मिर्ची याच्याशी संलग्न असलेली कोट्यवधी रुपयांची दक्षिण मुंबईतील प्रमुख मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
माहितीनुसार, इक्बाल मिर्चीच्या काही साथीदारांनी सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलची नासधूस केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यानंतर ईडीने गिरगावातील न्यू रोशन टॉकीजचा भूखंड ताब्यात घेतला. काल सीआरपीएफच्या अनेक जवानांसह ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. गिरगावातील पठ्ठे बापूराव मार्गावरील न्यू रोशन टॉकीज येथे असलेली मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) जप्त करण्यात आली आहे. इक्बाल मिर्ची आणि इतर आरोपींविरुद्ध आयपीसी, आर्म्स ॲक्ट, एनडीपीएस ॲक्ट यांसह अनेक कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच आधारे पीएमएलए अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती.
गिरगावची मालमत्ता, न्यू रोशन टॉकीज हा एक सिनेमा हॉल होता. इक्बाल मिर्चीने अंमली पदार्थांची तस्करी आणि मनी लाँड्रिंगसह बेकायदेशीर क्रियाकलापांमधून मिळालेल्या पैशाचा वापर करून ही जागा खरेदी केली होती. नंतर त्याचे रिअल इस्टेट गुंतवणुकीत रूपांतर करण्यात आले. ईडीच्या म्हणण्यानुसार, मिर्ची आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यासह प्रमुख ठिकाणी मालमत्ता घेण्यासाठी शेल कंपन्या आणि बेनामी व्यवहारांचा वापर केला.
हे ही वाचा:
नेपाळमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप; दिल्ली, बिहार, सिक्कीममध्ये जाणवले धक्के
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा अखेर राजीनामा
देशमुखांना मारताना आरोपी आनंद लुटत होते, व्हीडिओ काढत होते!
‘आका’ सोरोसला पुरस्कार, कोणाला आठवले यूपीए सरकार ?
२०१९ मध्ये ईडीने मिर्ची आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला होता. यावेळी न्यू रोशन टॉकीजसह अनेक मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यानंतर ईडीला या मालमत्तेचा ताबा घ्यायचा होता, परंतु मिर्चीच्या नातेवाईकांनी अपीलीय न्यायाधिकरणाकडून त्यावर स्थगिती मिळवली. त्यानंतर हा मुद्दा प्रलंबित ठेवण्यात आला. आता गेल्या महिन्यात इक्बाल मिर्ची याच्या साथीदारांनी एका सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलची नासधूस केली होती. तसेच मिर्चीच्या कुटुंबाकडून ही मालमत्ता तिसऱ्या व्यक्तीला विकण्याचे प्रयत्न सुरू होते.