राज्यात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असून मराठा आंदोलनाच्या दरम्यान राज्यात काही ठिकाणी तोडफोड आणि जाळफोडीच्या घटना घडल्या आहेत. सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांनी जाळपोळ केली. मनोज जरांगे पाटील यांनी जाळपोळ करू नका, असे आवाहन आंदोलकांना केले होते. मात्र, तरीही अशा घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बैठक घेतली. यामध्ये कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
सोमवारी रात्री १० ते ११ अशी जवळपास एक तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि सर्व पोलीस प्रमुख हजर होते. मराठा आंदोलनादरम्यान मालमत्तेची हानी आणि जीवितहानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आक्रमक भूमिका घेणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात जर हिंसक वातावरण निर्माण होत असेल तर वेळीच कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. मालमत्तेच नुकसान करणाऱ्यांकडून भरपाई घेण्याबाबत देखील बैठकीत चर्चा झाली. राज्यात अनेक ठिकाणी बसेस आणि आमदारांची घरे जाळण्यात आली. तर काही ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आला.
हे ही वाचा:
‘ट्रॅक्टर स्टंटबाजी’ करणाऱ्यांवर पंजाब सरकारने घातली बंदी!
ललित पाटीलवर ससून रुग्णालयाच्या डीनची कृपा; मुक्काम वाढविण्यासाठी पत्रव्यवहार
तेलंगणामध्ये प्रचारादरम्यान खासदारावर जीवघेणा हल्ला
शरद पवारांइतका ठामपणा शिंदे का दाखवत नाहीत?
दरम्यान, जाळपोळीची घटना घडल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. जाळपोळ करू नका उद्रेक करू नका, हे कोण करतेय ही शंका असो अथवा नसो. सर्वाना आवाहन करतो कोणतीही जळपोळीची बातमी आली तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल. हे थांबवलं नाही तर मला नाईलाजाने निर्णय जाहीर करावा लागेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.