पोलिस बेफाम का झाले?

पोलिस बेफाम का झाले?

भाजपाच्या युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ज्या पद्धतीने पोलिस अधिकारी या युवकाला मारहाण करत आहेत, ते दृश्य पोलिसांबद्दल नकारात्मक भावना वाढीस लागण्यास कारणीभूत ठरू शकेल. जालन्यात एका रुग्णालयात तोडफोड झाल्याच्या घटनेनंतर त्यात हा तरुण सहभागी असल्याच्या संशयातून त्याला पोलिसांनी ही मारहाण केली. पोलिसांच्या या कृतीचे कदापिही समर्थन करता येणार नाही. पाच ते सहा पोलिस अधिकारी आपल्याकडील लाठ्या-काठ्या घेऊन त्या तरुणावर तुटून पडल्याचे व्हीडिओत दिसते. काठी तुटेपर्यंत त्या पोलिसांनी तरुणाला मारहाण केली. यातून पोलिसांबद्दल फ्रंटलाइन वर्कर, कोरोना योद्धा म्हणून जी प्रतिमा आहे, तिलाच छेद जातो.

कोरोनाच्या या जवळपास एक-दीड वर्षाच्या काळात पोलिसांवर जो मानसिक ताण आहे, त्याची जाणीव सगळ्यांनाच आहे. त्याबद्दल लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूतीही आहे. गेल्या वर्षी तर पोलिस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी अशा तमाम कोरोनायोद्ध्यांना लोकांनी दिवे लावून, फुलांचा वर्षाव करून, टाळ्या आणि थाळ्या वाजवून त्यांचे ऋण मानले. त्यांच्या कार्याला दाद दिली. पोलिस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत, हेही खरे आहे. त्यात अनेक पोलिसांचे जीवही गेले आहेत. सुट्ट्या न घेता, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही उसंत न घेता पोलिस राबत आहेत, हेही खरे आहे. असे असले तरी ज्या पद्धतीने पोलिसांनी ही मारहाण केली आहे, ती अजिबात समर्थनीय नाही.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी

भाजपाचा शिवसेनेला ‘दे धक्का’, माथेरानमध्ये १० नगरसेवक फोडले

टाळेबंदीमुळे वाहनचालक-मालकांचा उत्पन्नाचा मार्ग बंद

मराठा आरक्षण हातून गेल्यानंतर ठाकरे सरकारकडून सबबींचा पाढा

कोरोनाकाळात सरकारने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन सगळ्यांनी राहायला हवे हे खरेच. पण अशा नियम मोडणाऱ्यांना काठ्यांनी मरेस्तोवर चोप देणे याचे कधीही समर्थन करता येणार नाही. या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवून त्यांच्याकडून दंड वसूल करता येईल, त्यांना धाक दाखवता येईल, त्यांच्यावर अगदीच कठोर कारवाई म्हणून त्याला पोलिस चौकीत बोलावून दम भरता येईल, पण पोलिसांनी मिळून त्या नियम मोडणाऱ्या, गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करणे केव्हाही मान्य केले जाणार नाही.

मागे छत्तीसगडमधील एका जिल्हाधिकाऱ्याचा असाच एक व्हीडिओ चर्चेत आला होता. त्यात जिल्हाधिकाऱ्याने दुचाकीवरून बाहेर पडलेल्या एका इसमाच्या थोबाडीत लगावत त्याचा मोबाईल खाली आपटला होता. नंतर त्या जिल्हाधिकाऱ्याने व्हीडिओ बनवून त्या कृत्याची माफीही मागितली. पण ही माफी मागून झालेली चूक निस्तरता येणारी नसते. आजचा जमाना हा डिजिटल आहे. तुम्ही केलेल्या चुकीचे सगळे पुरावे व्हीडिओ, फोटो या माध्यमातून कधी कुणाच्या मोबाईलमध्ये जमा होतील, हे सांगता येणे कठीण आहे. ते व्हीडिओ किंवा फोटो लागलीच सोशल मीडियावर व्हायरल होऊन झालेले कृत्य सगळ्या दुनियेसमोर क्षणार्धात येते. तेव्हा या अधिकाऱ्यांनी सावध राहणे, आपण कायद्याचे रक्षक आहोत, याचे भान बाळगणे गरजेचे आहे. मध्यंतरी असाच एक व्हीडिओ चर्चेत होता, तो एका पोलिस अधिकाऱ्याने भाजी विकणाऱ्या एका गरीब बाईकडील सगळी भाजी उडवून लावली. तिच्याकडे असलेल्या पिशवीतील भाजी उचकटून रस्त्यावर विखुरली गेली. हे कृत्य करून पोलिस निघून गेला. हे कृत्यही पोलिसांच्या या बेजबाबदारपणाचेच आहे. पंजाबातही एका पोलिसाने लाथेने भाजीची टोपली उडविल्याचा व्हीडिओ काहीदिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. भाजीपाला विक्री करणारे, छोटे ठेले लावणारे हे नियमांची भंग करत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. पण ती कारवाई कायद्याच्या कक्षेत राहूनच केली गेली पाहिजे. लाथाबुक्क्यांनी, लाठ्याकाठ्यांनी पोलिसांनी त्यांना धडा शिकविण्यास सुरुवात केली तर पोलिसांप्रती लोकांच्या मनात असलेली आदराची भावना संपायला वेळ लागणार नाही. एखाद्या नियंत्रणापलिकडे गेलेल्या गर्दीला रोखण्यासाठी पोलिस लाठीमार करतात. त्याची परवानगीही त्यांना असते पण एखाद्या व्यक्तीने नियम मोडले म्हणून त्याच्यावर थेट लाठीहल्ला करून बेदम मारणे हे समर्थनीय असू शकत नाही. आधीच गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रातील पोलिसांची जी लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत, त्याचा अनुभव आपण घेतो आहोत. अशा परिस्थितीत आपली प्रतिमा सुधारण्याकडे लक्ष देण्याऐवजी अशा बेफाम कृत्यातून पोलिस आहे तो सन्मान आणि आदरही गमावून बसू शकतात. पोलिसांनी असे बेफाम, बेकाबू होणे त्यांना परवडणारे नाही.

Exit mobile version