काही वर्षांपूर्वी भारतभर गाजलेले शीना बोरा हत्याकांड प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनी या प्रकरणात नवीन धक्कादायक खुलासा केला आहे. शीना बोरा अद्यापही जीवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जी हिने केला आहे. इंद्राणीने या संदर्भात सीबीआयला पत्र लिहिले आहे.
गुरुवार, १६ डिसेंबर रोजी इंद्राणी मुखर्जी हिने केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात सीबीआयच्या संचालकांना लिहिलेले पत्र प्रकाश झोतात आले आणि देशभर खळबळ उडाली. इंद्राणीने या पत्रात शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला आहे. तुरुंगात भेटलेल्या एका महिलेने इंद्रायणीला ही माहिती दिल्याचे तिने सांगितले आहे. ही महिला काश्मीर मध्ये शीनाला पाहिले असल्याचा आणि शीनाला भेटली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सीबीआयने काश्मीर येथे जाऊन शीना बोराचा शोध घ्यावा अशी मागणी या पत्राद्वारे इंद्राणी मुखर्जी हिने केली आहे. तर या व्यतिरिक्त सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर तिने यासंबंधातील अर्ज देखील केला आहे.
हे ही वाचा:
शरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र!
बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्यामुळे हाताला काम मिळेल!
पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली ट्विटरवर ठरले सर्वाधिक लोकप्रिय!
शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जीच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. २०१२ साली शीना बोराच्या हत्येचे प्रकरण समोर आले होते. २४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोरा हिची हत्या झाल्याचे उघड झाले होते. हे प्रकरण भारतभर चांगलेच गाजले असून २०१५ साली इंद्राणी मुखर्जीला या प्रकरणात अटक करण्यात आली. तेव्हापासून भायखळा येथील महिला तुरुंगात इंद्राणी मुखर्जीचा मुक्काम आहे. तिने वारंवार जामिनासाठी न्यायालयात अर्ज करूनही हे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.