माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पत्नी आणि डॉ. झाकीर हुसैन मेमोरिअल ट्रस्टच्या प्रकल्प व्यवस्थापक लुईस खुर्शीद यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. एकीकडे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे तर, दुसरीकडे ईडीनेही त्यांना नोटीस पाठवली आहे. ईडीच्या लखनऊ विभागीय कार्यालयाने त्यांना १५ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.
माजी खासदार लुईस खुर्शीद यांच्या विरोधात बरेलीच्या न्यायालयाने (एमपी एमएलए) आधीच अजामीनपात्र वॉरंट जाहीर केले आहे. या प्रकरणाची सुनावणी १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. लुईस यांच्यावर फसवणूक आणि अपहाराचा आरोप आहे. मात्र त्या न्यायालयात उपस्थित राहिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर आधीपासूनच जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. मात्र त्या तरीही न्यायालयात उपस्थित राहिल्या नाहीत.
हे ही वाचा:
गाझा युद्धात इस्रायलचे पुढील लक्ष्य रफा
दिल्लीत अतिक्रमणविरोधी मोहिमेत मशिद, मंदिरे आणि दफनभूमीवर बुलडोझर
हल्दवानी घटनेनंतर ५००० जणांविरुद्ध गुन्हा
गोळीबार प्रकरणातील जखमी भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंची प्राणज्योत मालवली
दिव्यांगांना पुरवल्या जाणाऱ्या मदत साधने वाटपात झालेल्या अपहाराचे हे प्रकरण आहे. मार्च २०१०मध्ये त्यांच्या ट्रस्टला उत्तर प्रदेशच्या १७ जिल्ह्यांमधील दिव्यांगांना मदत साधनांचे वाटप करण्यासाठी केंद्र सरकारकडून ७१ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मिळाले होते. मात्र. या ट्रस्टवर अपहाराचा आरोप होता आणि या प्रकरणी १७ जिल्ह्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. ही मदतसाधने वितरित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शिबीर घेण्यात आले नव्हते, असे तपासात उघड झाले. तेव्हा या प्रकरणी बरेलीतील भोजीपुरा पोलिस ठाण्यामध्येही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.