महाराष्ट्रातील एका वजनदार राजकीय नेत्याशी जवळीक असलेल्या दोन मोठ्या बिल्डरांवर आयकर खात्याने आज दसऱ्याच्या दिवशी धाडी टाकल्या. त्यांच्याकडे रोख रक्कम आणि दागिने यास्वरूपात आयकर खात्याला मोठे घबाड मिळाले आहे. त्यांच्या निवासस्थान, कार्यालयातून लॅपटॉप, हार्डडिस्क आणि अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आयकर खात्याच्या हाती लागली असून त्यातून बेनामी आणि हवालाच्या मार्गाने आलेल्या मोठ्या रकमेचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
प्राप्तीकर विभागाने नुकत्याच केलेल्या कारवाई दरम्यान मिळालेल्या पुराव्यांमधून अनेक बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार उघड झाले आहेत. प्राप्तीकर विभागाने मुंबईतील दोन बांधकाम व्यवसाय समूह आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती आणि संस्थांच्या कार्यालयांवर छापे टाकून ही जप्तीची कारवाई केली आहे. ७ ऑक्टोबर रोजी शोध मोहीमेला सुरुवात झाली होती. कारवाई दरम्यान मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरमधील सुमारे ७० ठिकाणी हे छापे टाकण्यात आले.
कारवाई दरम्यान हाती आलेल्या पुराव्यांमधून गैरव्यवहार उघड झाले आहेत. आक्षेपार्ह कागदपत्रे, दोन्ही समूहांचे एकत्र असे १८४ कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावे सापडले आहेत. या व्यावसायिक गटांनी विविध कंपन्यांचे जाळे निर्माण करून व्यवहार केल्याचे आढळून आले आहे. बोगस शेअर प्रीमियम, संशयास्पद असुरक्षित कर्ज, विशिष्ट सेवांसाठी आगाऊ रक्कम, काही सौदे यासारख्या विविध संशयास्पद मार्गाने बेहिशेबी निधी जमवण्यात आल्याचे निधीच्या प्रवाहाच्या प्राथमिक विश्लेषणातून समजते.
हे ही वाचा:
भारताची तालिबानशी चर्चेला तयारी?
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा!
काश्मीरमध्ये चकमक सुरूच; एका अधिकाऱ्याला आणि जवानाला वीरमरण
सरसंघचालकांनी केले अखंड भारताचे सूतोवाच
महाराष्ट्रातील एका प्रभावशाली कुटुंबाच्या सहभागातून हा निधीचा ओघ आल्याचे आढळून आले आहे. संशयास्पद पद्धतीने जमवण्यात आलेल्या या निधीचा उपयोग विविध मालमत्तांच्या अधिग्रहणासाठी केला गेला आहे. यात मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी कार्यालय इमारत, दिल्लीतील आलिशान परिसरातील फ्लॅट, गोव्यातील रिसॉर्ट, महाराष्ट्रातील शेतजमिनी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवणूक यांचा समावेश आहे. या मालमत्तांचे मूल्य सुमारे १७० कोटी रुपये असून २.१३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि ४.३२ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.