उत्तर प्रदेशच्या मेरठमधील डुंगरावली गावातील पंकज कुमार या २६ वर्षीय तरुणाने त्याचे लग्नाआधीचे विधी सोडून एका मिनी ट्रक चालकाचा पाठलाग केल्याची घटना घडली. ही घटना चर्चेत असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शनिवारी एका प्रवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलेला संपूर्ण भाग ऑनलाइन प्रसारित केल्यावर सोमवारी ही घटना उघडकीस आली. यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा रंगली असून अनेकांनी पंकज याच्या धाडसाचे कौतुक केले आहे तर काहींनी या कृत्याला मूर्खपणाचे कृत्य म्हटले आहे कारण यात त्याला गंभीर दुखापत होऊ शकली असती.
पंकज कुमार याने म्हटले आहे की, तो आपल्या कुटुंबासह गावातील मंदिराकडे जात होता त्यावेळी दिल्ली- डेहराडून महामार्गावर एक वाहन त्यांच्या जवळून भरधाव वेगाने निघून गेले. काही सेकंदात त्याला लक्षात आले की ड्रायव्हरने त्याच्या गळ्यातील पैशाची माळा हिसकावून घेतली आहे. त्याच वेळी जवळून वेगाने जात असलेल्या मोटारसायकलवर बसून तो गाडीच्या मागे गेला आणि महामार्गावर सुमारे ५०० मीटरपर्यंत त्याने वाहनाचा पाठलाग केला. थोड्या वेळाने पाठलाग केल्यानंतर पंकज याने चालत्या मिनी ट्रकवर उडी मारली.
हे ही वाचा :
एकनाथ शिंदेंचा कार्यकाळ संपला, दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा!
चंदीगडमधील दोन क्लबबाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी फेकली स्फोटके
पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार
विधानसभा निवडणुकीत ८५% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; १० वर्षांतील सर्वाधिक ३.५ कोटी रुपये जप्त
व्हायरल झालेल्या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये, नवरदेव लग्नाच्या पोशाखात वाहनावर चढताना आणि ड्रायव्हरला सक्तीने थांबवण्याआधी खिडकीतून त्याच्या केबिनमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. त्यानंतर पंकज आणि इतर काही जणांनी ड्रायव्हरला बेदम मारहाण केली. तथापि, वाहनाचे मालक मनीष सहगल यांनी सांगितले की, “ही कथा बनावट वाटत आहे. आम्हीही पोलीस तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा पाठपुरावा करू. माझा ड्रायव्हर जगपाल सिंग निर्दोष आहे.”