कल्याण प्रकरण; धीरज देशमुख यांच्यावर हल्ला करणारे सुमित जाधव, दर्शन बोराडे अटकेत

उर्वरित हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू

कल्याण प्रकरण; धीरज देशमुख यांच्यावर हल्ला करणारे सुमित जाधव, दर्शन बोराडे अटकेत

कल्याण येथील आजमेरा सोसायटीत मराठी कुटुंबियांना केलेल्या मारहाण प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. अखिलेश शुक्ला या व्यक्तीने मराठी माणसांविषयी गरळ ओकत देशमुख कुटुंबीयांना माराहाण केल्याची घटना घडली होती. याचा व्हिडीओ व्हायरल होताच हे प्रकरण समोर आले होते. हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमध्ये अकाऊंटंट मॅनेजर असलेल्या अखिलेश शुक्ला याच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती दिली. अखिलेश शुक्ला यालाही अटक करण्यात आली आहे. देशमुख कुटुंबीयांवर १० ते १५ जणांनी हल्ला केल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले होते. या हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून सुरू असून पोलिसांनी यातील दोन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांच्या विशेष पथकांनी शुक्रवारी देशमुख कुटुंबावर हल्ला करणाऱ्या दोन जण ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी मंत्रालयीन अधिकारी अखिलेश शुक्ला याला टिटवाळा- शहाड भागातून ताब्यात घेतले होते. तर, दुसरीकडे या प्रकरणात गुन्हा दाखल करताना हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची साहाय्यक पोलीस आयुक्त चौकशी करत आहेत. अशातच, हल्लेखोर सुमित जाधव (वय २३ वर्षे), रंगा उर्फ दर्शन बोराडे (वय २२ वर्षे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अभिजित देशमुख यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या दहा जणांवर गुन्हा दाखल असून त्यापैकी दोन जणांना विशेष पथकांनी ताब्यात घेतले आहे. या दोन जणांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. यापुर्वीचे आणि आताचा गुन्हा यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांची चार विशेष पथके उर्वरित हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा  : 

मॅग्डेबर्गमधील ख्रिसमस मार्केटमध्ये गाडी घुसून दोन ठार; सौदीच्या ५० वर्षीय डॉक्टरला अटक

हिवाळी अधिवेशनात व्यत्ययामुळे लोकसभेचे ७० तास वाया!

कल्याण मारहाण प्रकरण; अखिलेश शुक्लाने मांडली व्हिडिओतून बाजू!

संकटकाळात काय करायचं हे बोट चालकाने सांगितलं नाही!

प्रकरण काय?

कल्याणच्या योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या उच्चभ्रू रहिवाशांच्या सोसायटीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमध्ये अकाऊंटंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे आजूबाजूला राहतात. अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. या धूपाचा प्रचंड धूर होऊन याचा त्रास होऊ लागल्याने कळवीकट्टे कुटुंबीयांनी शुक्ला यांना बाहेर धूप न लावण्याची विनंती केली होती. यावरुन अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला यांनी उद्दामपणे कळवीकट्टे कुटुंबीयांशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी मध्यस्ती करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. अखिलेश शुक्ला याला याचा राग आला आणि त्याने काही गुंडांना बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले.

अनेक मराठी माणसांना शुक्ला याने त्रास दिला आल्याचा आरोप सोसायटीतील नागरिकांनी केला आहे. अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वीही अनेकदा मराठी माणसांविषयी अपमानजक शेरेबाजी केल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. तुम्ही मराठी माणसे घाण आहात तुमचा वास येतो. तुम्ही मांस मच्छी खाणारे आहात. तुमच्या सारखे मराठी माझ्याकडे झाडू मारायला आहेत, अशी शेरेबाजी शुक्ला कुटुंबीयांनी यापूर्वी केली होती. आपण IAS अधिकारी असल्याचे सांगून सोसायटीमधील रहिवाशांना शुक्ला धमकावायचा, अशीही माहिती मिळाली आहे.

Exit mobile version