पुणे शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हेगारी वृत्तीस आळा घालण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे पोलीस आयुक्तालयातील झोन-५ मधील पोलिस ठाण्यातील वेगवेगळ्या गुन्ह्यातील एकूण ६५ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग आणि वानवडी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगारांच्या अभिलेखाचा अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासावरून जानेवारी २०२३ ते आज पर्यंत सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा (हद्दपार) क. ५५, ५६, ५७ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ कार्यालयाकडून ७ टोळ्यांतील टोळी प्रमुख व त्यांचे टोळी सदस्य असे एकूण २१ गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा (हद्दपार) क.५५ प्रमाणे हद्दपार केले आहे. तर ४४ गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा (हद्दपार) क.५६, ५७ प्रमाणे हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. ६५ गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
मणिपूर व्हिडिओचा तपास करणार सीबीआय
…तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील पीडिताला अधिकाऱ्याच्या खिशातून व्याज
पुण्यात बँकेवर सायबर हल्ला; कोट्यवधी रुपये लंपास
म्यानमारमधून आलेल्या निर्वासितांचे बायोमेट्रिक्स जमा करणार
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा पोलीस उपायुक्त विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग शाहुराजे साळवे, सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख यांनी त्यांच्या विभागीय पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी, तपास पथकातील अधिकारी, पोलीस अंमलदार यांच्याकडून मुदतीत प्रस्ताव प्राप्त करुन घेतले. या प्रस्तावावर परिमंडळ -५ कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण काळे, पोलीस हवालदार राजेंद्रकुमार ननवरे, महिला पोलीस शिपाई अश्लेषा माने यांच्या पथकाने कारवाई केली.