यश शहा अपहरण- हत्या प्रकरणातील चारही आरोपी सुटले निर्दोष

पोलिस तपासातील ढिसाळपणामुळे बसला फटका

यश शहा अपहरण- हत्या प्रकरणातील चारही आरोपी सुटले निर्दोष

सन २००९मधील खळबळजक घटना ठरलेल्या डोंबिवलीतील १४ वर्षीय मुलाच्या अपहरण व हत्येप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. ‘या गुन्ह्याचा तपास योग्य प्रकारे करण्यात आला नाही. पोलिस तपासातही ढिसाळपणा होता. त्यामुळे न्यायालयाला आरोपींची सुटका करावी लागत आहे,’ असे मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

 

२८ जून २००९ रोजी नववीत शिकणाऱ्या यश शहा याचे डोंबिवलीतील शाळेजवळून अपहरण करण्यात आले होते. तसेच, कपडे शिवण्याचे काम करणाऱ्या त्याच्या वडिलांकडून २० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. मात्र ही चर्चा फिसकटली आणि यशची हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह बदलापूरमधील येवा गावातील एका झाडाखाली पुरण्यात आला होता. आरोपींचा अन्य प्रकरणांमध्येही सहभाग असल्यामुळे या आरोपींवर अपहरण आणि हत्येच्या गुन्ह्यासह मोक्काखालीही खटला चालवला जात होता.

हे ही वाचा:

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

इस्रायल हल्ल्यादरम्यान हमासचे दहशतवादी अमली पदार्थांच्या नशेत!

राजनैतिक अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईनंतर ट्रुडो पुन्हा बरळले

‘हमास पॅलेस्टिनी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत नाहीत’

या प्रकरणात तब्बल २७ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात तपासण्यात आल्या. मात्र त्यांच्यावरील गुन्हे सिद्ध होऊ शकले नाहीत. ‘आरोपींचा कबुलीजबाब नोंदवण्यात आला असला तरी त्यांना दोषी ठरवण्यासाठी तो पुरेसा नाही. शाळेत जाणाऱ्या निष्पाप मुलाची अशा क्रूरपणे हत्या करणाऱ्याला गंभीर शिक्षा दिली जाते. त्यामुळे केवळ आरोपींच्या कबुलीजबाबावरून त्यांना शिक्षा ठोठावणे, उचित नाही,’ अशी टिप्पणी न्यायालयाने दिली.

 

न्यायालयापुढे सादर झालेले पुरावे विश्वासार्ह नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, अशी पुस्तीही न्यायालयाने जोडली. साक्षीदार, विशेषतः पोलिस आणि तपास अधिकारी पुरेसे पुरावे सादर करण्यात अपयशी ठरले, असे न्यायालयाने नमूद केले.

Exit mobile version