गेमिंग ऍप प्रकरणात मुंब्र्यात ४०० लोकांचे धर्मांतर झाल्याच्या वृत्तानंतर मुंब्र्याला बदनाम करण्याचे हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. पण आता पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात देखील धर्मांतराचे एक प्रकरण समोर आले आहे. त्यात मुंब्रा येथून एकाला अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला अघोरी विद्या,काळी जादू प्रतिबंधक कायदा अंतर्गत अटक करण्यात आली असल्याचा दावा माणिकपूर पोलिसांनी केला आहे. मोहसीन सोनी असे मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या व्यक्तिचे नाव आहे. मोहसीन याने वसईत राहणाऱ्या राजेश (५४) यांचे धर्मांतर करून त्याला मोहम्मद फारुखी नाव देण्यात आल्याचा आरोप राजेश यांच्या कुटुंबीयांनी केला आहे, तसेच मोहसीन हा तंत्रमंत्राच्या जोरावर हिंदूंना इस्लाम धर्मात धर्मांतर करीत असल्याचा आरोप कुटुंबाने केला असून आम्हाला देखील त्याने अघोरी विद्या आणि काळ्या जादूची भीती दाखवत धर्मांतर करण्यासाठी आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होता असाही आरोप करण्यात आला आहे.
माणिकपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २६ मे रोजी वसईतील एका कुटुंबातील ५४ वर्षीय व्यक्ती राजेश हे अचानक बेपत्ता झाले होते, याप्रकरणी राजेशच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, दरम्यान काही दिवसांनी राजेश हे घरी परत आले व ते इस्लामिक धर्माप्रमाणे वागू लागले होते. या दरम्यान राजेश यांच्या कुटुंबाला मोहसीन सोनी नावाच्या व्यक्तीचा फोन आला व त्यांनी राजेश माझ्यासोबत मुंब्रा येथे होता असे सांगून कुटुंबाला त्याने काळी जादू अघोरी विद्या त्याला येत असल्याचे सांगून घाबरवत होता. त्याने हिंदू धर्माविरोधात काही गोष्टी त्यांना सांगितले व इस्लामिक साहित्याचे पीडीएफ मोबाईल वर पाठवले अशी तक्रार १२ मे रोजी राजेशच्या कुटुंबांनी केली होती.
हे ही वाचा:
मोबाईलसाठी एक लाख चोरले, पण वडिलांच्या धाकाने केली आत्महत्या!
सात महत्त्वाच्या शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटींचे प्रकल्प उभारणार
निदान जाहिरातीमुळे सरकार पडते का पाहू!
क्रिकेटमधील सर्वात महाग चेंडू, एका चेंडूत १८ धावा दिल्या
याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी मोहसीन सोनी याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २९५(अ)(जाणून बुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये, कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक विश्वासांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू) आणि कलम ३ (प्रचार किंवा प्रचार), मनुष्य बळी आणि इतर अमानुष, वाईट आणि अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंध कायदा २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला असता त्याचे मोबाईल टॉवर लोकेशन मुंब्रा येथे मिळून आले, मंगळवारी पोलीस पथकाने मोहसीन याला मुंब्रा येथून अटक केली आहे. मोहसीन याच्याकडे सर्वस्तरातून चौकशी सुरू असून काही तांत्रिक पुरावे ताब्यात घेऊन त्याचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.