उत्तर मुंबईत गेल्या काही महिन्यांमध्ये बाईक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. बाईक चोरी करणाऱ्या एका टोळीला एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे.
अटक केलेल्या तीन आरोपींकडून सव्वादहा लाख रुपयांसह नऊ बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. गणेश पटेल, अजय महेंद्र आणि सुनिल कुऱ्हाडे अशी अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. सध्या हे तीनही आरोपी पोलीस कोठडीत आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून बाईक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता सर्वच पोलीस ठाण्यात अशा टोळ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हाच बोरिवलीत एक बाईक चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली असता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आणि काही तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांना काही संशयितांची ओळख पटली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक अजितकुमार वर्तक यांच्या पथकाने बोरिवली, चारकोप परिसरातून तीन जणांना ताब्यात घेतले.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये सामना सुरु होण्यापूर्वी मालिकाच रद्द
अफगाणिस्तानात ‘घटना’ कट्टरतेची जाणीव करून देणारी
विराट कोहलीने केले होते रोहित शर्माला डावलण्याचे प्रयत्न
धक्कादायक: दहा डीसीपींकडून गोळा केले ४० कोटी रुपये
लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाल्याने त्यांनी बाईक चोरी करण्यास सुरुवात केली होती. वर्षभरात त्यांनी बोरिवली, चारकोप, गोरेगाव, एमएचबी परिसरातून नऊ बाईक चोरी केल्याची कबुली दिली. हे आरोपी बाईकचा क्रमांक वापरून तिचा वापर करत असत. तीनही आरोपी हे चारकोप गावचे रहिवासी असून पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वादहा लाख रुपयांसह नऊ बाईक जप्त केल्या. अटकेनंतर या तिघांना बोरिवली स्थानिक न्यायालयाने शनिवार १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.