अँटालिया प्रकरणी एनआयएकडून दोघांना अटक

अँटालिया प्रकरणी एनआयएकडून दोघांना अटक

हिरेन हत्याप्रकरणातही हात असल्याचा संशय

मुकेश अंबानी यांच्या अँटालिया घराजवळ जिलेटीनने भरलेल्या कार प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दोन जणांना अटक केली आहे. संतोष शेलार आणि आनंद जाधव अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आनंद जाधव याला लातूर येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

या दोघांना एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना २१ जून पर्यत एनआयए कोठडी सुनावली आहे.अटक करण्यात आलेल्या दोघांचा मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील समावेश असल्याचे समोर येत आहे. विनायक शिंदे याच्यासोबत या दोघांनी मनसुख हिरेन याची हत्या करून मृतदेह मुंब्रा खाडीत टाकल्याचा संशय एनआयएला आहे.

हे ही वाचा:

मराठा मूक मोर्चापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी साधला संवाद

संतप्त स्वभावाच्या सेवानिवृत्त पोलिसाने मुलांनाच गोळ्या घातल्या

एकनाथ शिंदेंविरोधात ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्याबद्दल अभिनेत्याला अटक

सोनियांच्या प्रभावामुळे शिवसेना राज्यात फॅसिझम राबवतेय काय?

मनसुख हिरेन आणि अँटालिया स्फोटके प्रकरणाचा तपास एकत्र करण्यात आला असून या प्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. १) सचिन वाझे २) रियाजुद्दीन काझी ३) सुनील माने ४) विनायक शिंदे ५) नरेश गोर ६) संतोष शेलार ७) आनंद जाधव, अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत.

अटक करण्यात आलेले संतोष शेलार आणि आनंद जाधव हे दोघे मालाड पूर्व कुरार व्हिलेज येथे राहणारे असून या दोघांना पोलीस निरीक्षक सुनील माने याच्या सांगण्यावरून या गुन्हयासाठी मनसुख हिरेनच्या हत्येसाठी तयार करण्यात आले होते. संतोष शेलार हा पेशाने बिल्डर असून कुरार व्हिलेज मालाड पूर्व, शांताराम तलाव या ठिकाणी त्याचे कार्यालय आहे.

या स्फोटकांच्या तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. त्या प्रकरणात सचिन वाझे या पोलिस अधिकाऱ्याला पकडण्यात आले होते. नंतर त्याला आणि इतर अधिकाऱ्यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

Exit mobile version