महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यामध्ये समाजातील दोन गटांमध्ये शनिवारी हिंसाचाराची घटना घडली आहे. शहरात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या असून एकाचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारात एका पोलिसासह तीनजण जखमी झाले आहेत.
परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला असून सध्या येथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील गंगाधर चौक, पोला चौक, हरिहर पेठ परिसरात ही घटना घडली. दोन गटांमधील समाजकंटकांनी एकमेकांवर दगडफेक केली, अनेक गाड्यांची तोडफोड केली. तसेच काही वाहने पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
प्राथमिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यामध्ये शनिवारी संध्याकाळी इन्स्टाग्रामवर एक वादग्रस्त पोस्ट शेअर करण्यात आली. त्या पोस्टवरून काही लोक एकत्र येऊन पोलिस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा गट पोलिस ठाण्यात असतानाच जमाव प्रक्षुब्ध झाला आणि त्याने गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता जमावाने दगडफेक करून गाड्या पेटवून दिल्या.
हे ही वाचा:
बनावट नोटा प्रकरणी एनआयएकडून मुंबईत एकाला अटक; शस्त्रसाठा जप्त
मोदींचा करिष्मा सोबत आहेच पण स्थानिक नेतृत्वाचे काय?
बृजभूषण सिंह यांचे कुस्ती महासंघ अध्यक्षपद गेले!
बनावट नोटा प्रकरणी एनआयएकडून मुंबईत एकाला अटक; शस्त्रसाठा जप्त
या दरम्यान दुसरा गटही रस्त्यावर उतरला आणि दोन्ही गटांमध्ये दगडफेकीला सुरुवात झाली. ही दगडफेक सुमारे एक तास सुरू होती. समाजकंटकांनी पोलिसांच्या गाडीसह अग्निशमन दलाच्या गाडीलाही लक्ष्य केले. यात काही अग्निशमन जवान जखमी झाले.
जमावावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा सामना करावा लागला. जवळच्या वाशिम, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यांतूनही पोलिसांची कुमक मागवावी लागली. पोलिसांच्या दोन तुकड्यांनी दंगल करणाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १५ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे अतिरिक्त पोलिस सुप्रिटेण्डण्ट मोनिका राऊत यांनी सांगितले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.