कोविड घोटाळा प्रकरणी ईडीच्या हाती लागली महत्त्वाची डायरी

डायरीत अनेक नेते आणि अधिकाऱ्यांची नावे

कोविड घोटाळा प्रकरणी ईडीच्या हाती लागली महत्त्वाची डायरी

करोना महामारीच्या काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दोन दिवसांपूर्वी मुंबई आणि पुण्यात धाडी टाकल्या होत्या. यावेळी ईडीच्या हाती महत्त्वाची डायरी लागली असून यात अनेक नेते आणि अधिकाऱ्यांची नावे असल्याची माहिती पुढे आली आहे.

ईडीने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आणि सुजीत पाटकर यांच्या निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. याचवेळी मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीय जयस्वाल, माजी अधिकारी हरीश राठोड आणि माजी उपायुक्त रमाकांद बिरादार यांच्यासह १७ ठिकाणीही धाड टाकण्यात आली होती. सलग १७ तास झालेल्या या छापेमारीमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती. ईडीच्या धाडसत्रात अधिकाऱ्यांना एका मध्यस्थाच्या घरी एक महत्त्वाची डायरी हाती लागली. या डायरीत कोविड सेंटरचे कंत्राट घेण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याला किती लाच देण्यात आली, याचा विस्तृत तपशील नमूद आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत. विशेष म्हणजे ज्या मध्यस्थाच्या घरी ही डायरी सापडली, त्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचाही दावा केला जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडी यापुढे या डायरीतील माहितीच्या आधारावर आपला तपास करेल. कुणाला किती लाच मिळाली? त्यांची या घोटाळ्यात कोणती भूमिका होती? अशी यासंबंधी चौकशी केली जाईल. हे अधिकारी कोण आहेत? ते सेवानिवृत्त झालेत की अजूनही कार्यरत आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या डायरीमुले बीएमसीच्या अधिकाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येतात हाच त्यांच्या कर्तृत्वाचा विजय

सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले १० कोटींचे हेरॉईन

आम्ही घरात घुसत नाही, घुसलोच तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही

उद्धव ठाकरे म्हणतात मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी मुद्दाम बसलो

ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, करोना काळातील हा घोटाळा तब्बल ४ हजार कोटींचा आहे. त्यात अनेक बीएमसी अधिकारी उच्चपदस्थ सनदी अधिकारी आणि राजकारण्यांशी संबंध असणाऱ्या अनेक खासगी व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्यावर कंत्राटदारांना कंत्राटे मिळवून देण्यासाठी बीएमसीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत साधल्याचा आरोप आहे. कोविड घोटाळ्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यांच्यात कार्यकाळात खरेदी विभागात हा घोटाळा झाला होता. त्यामुळे त्यांची चौकशी होणे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version